Tuesday, May 10, 2022

वनामकृवित विज्ञान संकुलाचे मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते भुमिपुजन संपन्‍न

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठत उभारण्‍यात येणा-या विज्ञान संकुलाचे भुमिपूजन सोहळा पर्यटन व पर्यावरण मंत्री मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते दिनांक 10 मे रोजी संपन्‍न झाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी ऍस्‍ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्‍यात झालेल्‍या सामंजस्‍य करारानुसार विद्यापीठ परिसरातील नियोजित जागेवर भव्‍य विज्ञान संकुल उभारण्‍यात येणार असुन संकुल उभारणीसाठी पर्यटन व पर्यावरण मंत्री मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांनी निधी उपलब्‍ध करून दिला आहे. याकरिता परभणीचे आमदार मा डॉ राहुल पाटील यांच्‍या पुढाकारातुन निधी उपलब्ध झाला आहे. 

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्‍यासपीठावर सामाजिक न्‍याय मंत्री तथा परभणी पालकमंत्री मा ना श्री धनंजय मुंडे, उच्‍च व तंत्र शिक्षण मंत्री मा ना श्री उदय सामंत, परभणीचे खासदार मा श्री संजय जाधव, हिंगोलीचे खासदार मा श्री हेमंत पाटील, परभणीचे आमदार मा श्री राहुल पाटील, प्रभारी कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद टाकसाळे, अप्‍पर जिल्‍हाधिकारी श्री राजेश काटकर, परभणी ऍस्‍टॉनॉमिकल सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ रामेश्‍वर नाईक, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात पर्यटनमंत्री मा ना श्री आदित्‍य ठाकरे म्‍हणाले की, आज समाजास रोजगार, पाणी आदींची गरज आहे. सर्वांनी राजकारणाच्‍या पुढील विचार केला पाहिजे. केवळ शिक्षणच समाजाला व देशाला पुढे नेऊ शकेल. परभणीतील विज्ञान संकुल देशातील पहिलेच भव्‍य संकुल असेल यास कोणत्‍याही प्रकारचा निधी कमी पडु दिला जाणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये जागतिक पातळीचे शास्‍त्रज्ञ घडण्‍याची क्षमता आहे. या विज्ञान संकुलामुळे भावी जागतिक शास्‍त्रज्ञ ग्रामीण भागातुन घडतील, हा अत्‍यंत अभिनव उपक्रम आमदार डॉ राहुल पाटील यांच्‍या संकल्‍पनेतुन साकारत आहे. परभणी हे 'जगात जर्मनी अन भारतात परभणी' असे न घेता जगात परभणी' असे नावारूपाला येईल. परभणी कृषि विद्यापीठातील डिजिटल तंत्रज्ञानावरील प्रकल्‍पामुळे शेतकरी बांधवाचे कष्‍ट कमी करणारे यंत्र विकसित होत आहेत.

भाषणात मा ना श्री धनंजय मुंडे म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने डिजिटल शेत तंत्रज्ञान निर्मितीमध्‍ये पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी प्रशासनात विविध पदावर कार्यरत आहेत. मराठवाडात मोठया प्रमाणावर पर्यटन विकासास वाव आहे. विज्ञान संकुलास पालकमंत्री म्‍हणुन निधी कमी पडु देणार नसल्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले.   

मा ना श्री उदय सामंत म्‍हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन विकसित व्‍हावा याकरिता अकृषि विद्यापीठातही विज्ञान संकुलाची संकल्‍पना राबविण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल.

खासदार मा श्री संजय जाधव म्‍हणाले की, आज विज्ञानाचे युग असुन  परभणीतील विज्ञान संकुल उभारणारे देशातील पहिलेच कृषि विद्यापीठ असेल. परभणी पर्यटन विकासास मोठा वाव असुन मा ना श्री आदित्‍य ठाकरे याकरिता प्रयत्‍न करावेत असे म्‍हणाले.

आमदार मा डॉ राहुल पाटील म्‍हणाले की, मनोरंजन, शिक्षण आणि रोजगार ही तीन उद्दीष्‍ट डोळयासमोर ठेऊन देशातील भव्‍य असे जागतिक दर्जाचे विज्ञान संकुल परभणी साकारत आहे, याकरिता पर्यटन मंत्री मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांनी भरीव असा निधी दिला आहे.  नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुशाखीय शिक्षणास प्राधान्‍य देण्‍यात आले असुन यास अनुरूप हे विज्ञान संकुल असणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन वाढीस लागणार आहे.

प्रभारी कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने गेल्‍या पन्‍नास वर्षात कृषि विकासात भरीव असे योगदान दिले असुन आज विद्यापीठापुढे मनुष्‍यबळाची कमतरता असुन लवकर नौकर भरतीची आवश्‍यकता असल्‍याचे ते म्‍हणाले. 

प्रास्‍ताविकात डॉ रामेश्‍वर नाईक म्‍हणाले की, परभणीतील विज्ञान संकुलात सर्व विज्ञान एकाच छत्राखाली पाहण्‍यास मिळणार आहे. यामुळे समाजात विज्ञानवादी दृष्‍टीकोन वाढीस लागणार आहे. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण आणि डॉ दुर्गादास डोंबे यांनी केले. यावेळी परभणी ऍस्‍ट्रॉनॉमिकल सोसायटीने राबविलेल्‍या विविध वैज्ञानिक उपक्रमांची आणि तांबट शॉर्ट फिल्‍मचे सादरीकरण करण्‍यात आले. तसेच डे टाईम ऍस्‍ट्रॉनॉमी मध्‍ये सुर्यदर्शन व सौर डाग यांचे निरीक्षण करण्‍यात आले. इग्नायटेड माईंडस या विद्यार्थी गटांनी तयार केलेल्‍या रिसर्च पेलोड सॅटॅलाईट चे प्रक्षेपण करण्‍यात आले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी, विज्ञानप्रेमी, विद्यार्थी व नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.