Saturday, May 20, 2023

तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक ...... कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या वतीने राष्‍ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा

११ मे, १९९८ रोजी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवली. या प्रगतीचे प्रतीक म्‍हणुन देशात राष्‍ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या वतीने ११ मे रोजी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ ऑनलाईन पद्धतीने कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या विशेष व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते.

मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक असुन सर्जनशीलतेच्या जोरावर आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आणि शारीरिक क्षमतेच्या हजारोपट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक प्रगतीचे एकामागोमाग अनेक टप्पे गाठले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने केलेले प्रगती आणि त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बहुमूल्य योगदानाचे स्मरण राहावे या उद्देशाने राष्‍ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. एका बाजूने सूक्ष्मतम अणूतील ऊर्जा आपल्या कामी आणली आहे आणि दुस-या बाजूला अनंत अवकाशात भरारी घेतली आहे. यावेळी त्‍यांनी विज्ञानातील अनेक दाखले देऊन तंत्रज्ञानाची पायाभरणी विज्ञानातून कशी होते हे सांगितले. जसे वाफेचे, डिझेलचे इंजिने वापरात आल्यानंतर कालांतराने त्यांच्या कार्यामागची तत्त्वे सांगणारे उष्मागतिशास्त्र सांगितले. त्यांनी प्रकाश, ध्वनी, विद्युतशस्त्रांची कृषी व दैनंदिन जीवनातील उपयोगिता विषद केली. तसेच भारतातील अलीकडील वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती दर्शविणाऱ्या महाराष्ट्रात बांधले जाणारे लिगो-इंडिया प्रकल्‍प हे भारतातील पहिले इंटरफेरोमीटर बद्दल माहिती दिली.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाची या वर्षीची थीम 'स्कूल ते स्टार्टअप्स - इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट' या बद्दल माहिती विषद केली. सूत्रसंचालन व समन्वयन डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. संतोष फुलारी यांनी केले तर आभार डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास मराठवाड्यातील विविध कृषी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. हेमंत पाटील, प्राचार्य डॉ. जहागीरदार, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. राकेश अहिरे, डॉ. वाघमारे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. जया बंगाळे, डॉ. भगवान असेवार आदीसह विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.