Monday, May 1, 2023

वनामकृवित महाराष्‍ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन साजरा

शेती व शेतकरी कल्‍याणाकरिता समर्पित भावनेने कार्य करू ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक मे रोजी महाराष्‍ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य क्रिडा  प्रांगणात कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. याप्रसंगी महाराष्‍ट्र दिन जागतिक कामगार दिनाच्‍या कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा मोठा असुन राज्याने देशाच्या स्वातंत्र्यात आणि देशाच्या प्रत्येक विधायक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्राचा धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असुन महाराष्ट्र ही संत, महंत, ऋषींची तसेच वीरांची भूमी आहे. या भूमीला शौर्य, त्याग आणि देशभक्तीची परंपरा लाभली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्‍याची आपणास संधी मिळाली आहे, हे आपले भाग्य आहे. मराठवाडा विभागाच्या कृषी विकासात विद्यापीठ योगदान देत आहे. आजपर्यंत, परभणी कृषि विद्यापीठाने संशोधनावर आधारित १४८ विविध पीकांच्‍या जाती विकसित केल्या असुन १००४ कृषी-तंत्रज्ञानाच्या शिफारशी दिल्‍या तसेच  ५३ कृषी अवजारांची निर्मिती केली आहे, याचा  लाभ शेतकरी बांधवाना होत आहे. सोयाबीन, तुर, ज्वारी पिकांतील विद्यापीठ विकसित अनेक उत्कृष्ट वाण शेतकरी बांधवामध्‍ये प्रचलित असुन यामुळे त्‍यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांकडून विद्यापीठ बियाण्यांना मोठी मागणी असुन बीजोत्‍पादन वाढीकरिता विद्यापीठ प्रयत्न करित आहे. यंदा संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय भरड धान्‍य वर्ष साजरे करत असून यामध्ये आपल्या विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे असेल. कारण भरड धान्‍यामधील ज्‍वारी व बाजरी ही दोन पिक मुख्‍य पिके असुन परभणी विद्यापीठाने ज्वारीमध्ये परभणी शक्ती ही देशातील पहिली जैवसंपृक्‍त वाणाची निर्मिती केली असुन बाजरीमध्‍ये एएचबी-१२०० एफई आणि एएचबी-१२६९ या दोन जैवसंपृक्‍त वाण विकसित केले, यात लोह आणि जस्‍तचे प्रमाण जास्त आहे. या वाणाखालील लागवडीचे क्षेत्र वाढीकरिता प्रयत्‍न करावा लागेल. विद्यापीठाने माझ्या बळीराजासाठी माझी एक दिवसीय मोहीम मराठवाड्यातील ३०० पेक्षा जास्‍त गावांमध्ये राबविली, या मोहिमेमुळे शेतकरी आणि विद्यापीठ यांचे नाते घट्ट होण्यास मदत झाली आहे. विद्यापीठाने देश-विदेशातील अनेक शासकीय संस्‍था व खासगी कंपन्‍या यांसोबत सामंजस्‍य करार केले आहेत, यामध्ये जगातील अग्रगण्‍य अशा अमेरिकेतील कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा, लिंकन नेब्रास्का युनिव्हर्सिटी विद्यापीठांचा समावेश आहे. याव्‍दारे कृषी संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात एकत्र काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठवाड्यात कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्‍यात येत असुन लवकरच कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी यांत्रिकीकरणावर मोठया प्रमाणावर प्रशिक्षणे आयोजित करण्यात येणार आहेत. मराठवाडयातील शेतकरी बांधवाकरिता औषधी वनस्‍पती लागवड हे चांगला पर्याय ठरू शकेल, याकरिता विद्यापीठ संशोधनास चालना देणार आहे. विद्यापीठाच्‍या आठ संशोधन प्रकल्पांसाठी नुकतेच शासनाकडुन पंचवीस कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, यामुळे विद्यापीठ संशोधनास मदत होणार आहे. नाहेप प्रकल्पाच्या माध्यमातून डिजिटल कृषी तंत्रज्ञान विकासावर भर देण्यात येत असून कृषी क्षेत्रात कृषी रोबोट्स आणि ड्रोन तंत्रज्ञान वापराबाबत प्रचार केला जाणार आहे. डिजिटल शेती तंत्रज्ञानात आपले विद्यापीठ देशात अग्रेसर असेल. विद्यापीठाचे २६ विद्यार्थ्यांनी थायलंड आणि स्पेनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिजिटल तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण पूर्ण केले असुन तीन प्राध्यापकांनी अमेरिकेत व थायलंडमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे, ही विद्यापीठाच्या दृष्‍टीने एैतिहासिक बाब आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधेकरिता विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. शेती व शेतकरी कल्‍याणाकरिता सर्वांनी एकत्रित समर्पितपणे काम करण्याचा संकल्प करू, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. 

कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्री के एम कोल्‍हे, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्राचार्या डॉ जया बंगाळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आदींसह विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री उदय वाईकर यांनी केले.