Saturday, May 27, 2023

राजकोट (गुजरात) ये‍थे आयोजित गौ टेक २०२३ एक्‍सपो प्रदर्शनीत वनामकृविच्‍या पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या दालनास अभुतपुर्व प्रतिसाद

सुधारित बैलचलित अवजारांचा वापर काळाची गरज-केंद्रीय मंत्री श्री. पुरुषोत्तम रुपालाजी यांचे प्रतिपादन

राजकोट (गुजरात) येथे राष्‍ट्रीय स्‍तरीवरील गौ-टेक २०२३ एक्‍सपो प्रदर्शनीचे दिनांक २४ मे ते २८ मे दरम्‍यान करण्‍यात आले असुन यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत पशूशक्तीचा योग्य वापर योजनेने विकसित केलेले सुधारित बैलचलित अवजारे व तंत्रज्ञानाचे प्रदर्शनीचे दालन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनानुसार लावण्‍यात आले आहे. गौ-टेक 2023 एक्सपोचे आयोजन ग्‍लोबल कन्‍फेडरेशन ऑफ काऊ बेस्‍ड इंडस्‍ट्रीजचे संस्थापक डॉ. वल्लभभाई कथारिया यांनी केले आहे. सदर प्रदर्शनीचे उदघाटन भारत सरकारचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मत्स्य विभागाचे केंद्रीय मंत्री माननीय श्री पुरुषोत्तमजी रुपाला यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. माननीय श्री पुरुषोत्तमजी रुपाला आणि केरळचे माननीय राज्‍यपाल मा श्री अरिफ मोहम्‍मद खान यांनी वनामकृविच्‍या बैलचलित अवजारे व तंत्रज्ञान प्रदर्शनी दालनास भेट देउन पाहणी केली.

प्रकल्पाच्या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोळंकी अवजारे व तंत्रज्ञान बद्दल माहिती देतांना सांगितले की, या प्रकल्पांतर्गत ३०-३२ बैलचलित अवजारे विकसित करण्यात आली असुन हे तंत्रज्ञान देशातील शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न आहे. या सुधारित अवजारामध्ये बैलचलित टोकन यंत्र, धसकट गोळा करणे यंत्र, कापूस टोकण यंत्र, प्लास्टिक अंथरणी यंत्र , हाळदीस व उसास माती लावणे यंत्र, बैलचलित सोलार फवारणी यंत्र, एक बैलाच्या आधारे चालविली जाणारी अवजारांचा संच, आजारी पशु उभा करणे यंत्र, सुधारित जू, हळद काढणी यंत्र, इत्यादी अवजारांचा समावेश आहे. ही अवजारे पर्यावरण पूरक, कमी खर्चाची पेट्रोल व डिझेल ची आवश्यकता न लागणारी वेळेची बचत कृषी निविष्ठांची बचत व पशु व मानवास लागणारे श्रम करण्याचे यंत्र आहेत. अवजारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी योजनेद्वारे शेतकरी मेळावे, प्रदर्शनी, चर्चासत्रे व प्रात्यक्षिके आणि तांत्रिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

दालनाची पाहणी करतेवेळी मा. श्री पुरुषोत्तमजी रुपाला यांनी प्रकल्‍पाव्‍दारे विकसित केलेल्‍या अवजारे यांचे कौतुक करून देशभरातील शेतकरी, गौशाळा चालक व पशुचालकांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन सेंद्रिय शेती ची कास धरून उत्पन्न वाढवण्‍याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित शेतकरी बांधव व गौशाळा चालक यांनी मा. मंत्री महोदयाकडे बैलचलित सुधारित अवजारावर शासनातर्फे सबसीडी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

आयोजक डॉ .वल्लभभाई कथारिया यांनी वनामकृविचे प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदविल्‍याबद्दल कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांचे आभार व्यक्त केले. प्रकल्प समन्वयीका डॉ. स्मिता सोळंकी, पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, अपारंपारिक ऊर्जा विभाग प्रमुख डॉ .राहुल रामटेके, इंजि. अजय वाघमारे व सर्व सहकारी यांचे अभिनंदन केले.