Tuesday, May 9, 2023

येणा-या खरीप हंगामात होऊ शकतो किड – रोगांचा प्रादुर्भाव, उपाययोजनेबाबत मोठया प्रमाणात जनजागृतीची गरज .... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

मराठवाडातील कृषि विभागातील अधिकारी व वनामकृवि शास्‍त्रज्ञ यांच्‍या संयुक्‍त बैठकीत येणा-या हंगामात संभाव्‍य किड – रोग प्रादुर्भाव व व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन व चर्चा

येणा-या खरीप हंगामात मराठवाडयात शंखी गोगलगाय, सोयाबीनवरील खोडमाशी व पिवळा मोझॅक, कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व बोंडसड, हुमणी किड आदी मुख्‍य किड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्‍याकरिता प्रतिबंधात्‍मक उपाय करणे गरजेचे आहे. याकरिता प्रतिबंधात्‍मक उपायाबाबत शेतकरी बांधवापर्यंत माहिती पोहचविण्‍याकरिता कृषि विद्यापीठ, जिल्‍हा प्रशासन, व कृषि विभाग यांनी संयुक्‍त मोहिम राबवावी. गेल्‍या वर्षी शंखी गोगलगाय मुळे झालेल्‍या प्रादुर्भावामुळे मोठया प्रमाणात शासनाला नुकसान भरपाई दयावी लागली, यासारखे होणारे नुकसान टाळण्‍याकरिता सर्वांनी एकत्रितरित्‍या मोहिम राबवु, त्‍याकरिता कृषि विभाग व कृषि विद्यापीठ मिळुन काटेकोर नियोजन करू, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, जिल्‍हा प्रशासन व कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक ८ मे रोजी खरीप हंगामातील संभाव्‍य कीड – रोग व्‍यवस्‍थापनाकरिता पुर्व तयारी व विशेष मोहिम बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री विजय लोखंडे, श्री प्रकाश देशमुख, श्री दत्तात्रेय गवसाने, श्री रविशंकर चलवदे, श्री महेश तीर्थकर, श्री आर टी जाधव, प्राचार्य डॉ संजीव बंटेवाड, विभाग प्रमुख डॉ पुरूषोत्‍तम नेहरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस ऑनलाईन पध्‍दतीने आठही जिल्‍हयातील जिल्‍हाधिकारी, त्‍यांचे प्रतिनिधी व कृषि अधिकारी उपस्थित होते.  

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, शंखी गोगलगाय हा एक घातक शुत्र आहे, कारण ही एक उभलींगी, निशाचार, कवच असलेली कीड असुन कोणत्‍याही पिकांचा फडसा पाडु शकते. याचा प्रादुर्भाव शेतकरी केवळ वैयक्तिकरित्‍या उपाय योजना करून टाळु शकणार नसुन सामुदायिकरित्‍या वेळेवर प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. यावर्षी ही या घातक कीडींचा प्रादुर्भाव होण्‍याची शक्‍यता लक्षात घेता, सर्वांनी कंबर कसण्‍याची आवश्‍यकता आहे. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी सदर किड - रोग व्‍यवस्‍थापनाबाबत प्रमाणित कार्य पध्‍दती निश्चित केली असुन ही माहिती शेतकरी बांधवापर्यंत पोह‍चविण्‍याकरिता गावपातळीवर प्रशिक्षणे व कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात येऊन विविध प्रसारमाध्‍यमे, समाजमाध्‍यमे, युटयुब, घडीपत्रिका, भिंतीपत्रक आदीच्‍या माध्‍यमांचा वापर करण्‍यात येणार आहे. 

डॉ देवराव देवसरकर आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्‍या समन्‍वयाने संपुर्ण मराठवाडयात शेतकरी बांधवा मध्‍ये संभाव्‍य किड व रोगाबाबत जनजागृती करण्‍यात येईल.

तांत्रिक सत्रात शंखी गोगलगायचे एकात्मिक व्‍यवस्थापनावर मार्गदर्शना डॉ पुरूषोत्‍तम झंवर म्‍हणाले की, ज्‍या भागात शंखी गोगलगायचे प्रादुर्भाव होण्‍याची शक्‍यता आहे, तेथे सामुदायिकरित्‍या उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे सांगुन त्‍यांनी गोगलगायी व्‍यवस्‍थापनाबाबत प्रमाणित कार्य पध्‍दती बाबत माहिती दिली. सोयाबीनवरील खोडमाशी व पिवळा मोझॅक यावरील डॉ राजेंद्र जाधव यांनी मार्गदर्शनात उन्‍हाळी सोयाबीनमुळे पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव होण्‍याची शक्यता व्‍यक्‍त केली, कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व बोंडसड यावर मार्गदर्शन करतांना डॉ बस्‍वराज भेदे म्‍हणाले की, गेल्‍या हंगामातील कापसाचा फरदड उशीरा पर्यंत होता, त्‍यामुळे गुलाबी बोंडअळीचा उद्रेक होऊ शकतो. मराठवाडयातील कापुस उत्‍पादकता वाढीबाबत डॉ अरविंद पंडागळे मार्गदर्शन केले तर हुमणी किडीचे एकात्मिक व्‍यवस्‍थापनावर डॉ अनंत लाड आदींनी मार्गदर्शन केले. चर्चासत्रात कृषि अधिकारी यांच्‍या शंकाचे निरासरन विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी केले. सुत्रसंचालन डॉ अनंत लाड यांनी केले तर आभार डॉ पुरूषोत्‍तम नेहरकर यांनी मानले. बैठकीस मराठवाडा विभागातील जिल्‍हा प्रशासनाचे अधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी व विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ मोठया संख्‍येने उपस्थित होते.