Friday, May 5, 2023

जमिनीचे आरोग्य सुधारणे गरजेचे ..... डॉ गजानन गडदे

मौजे दुर्डी येथे माती परीक्षण मोहिम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, इफको आणि रिलायंस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ मे रोजी परभणी जिल्ह्यातील मौजे दुर्डी येथे माती परीक्षण मोहिम राबविण्यात आली. सदरील मोहिमे अंतर्गत ५० शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीतील मातीचे नमुने इफकोच्या मोबाईल व्हॅनमध्ये मोफत तपासणी करून त्याची आरोग्यपत्रीका शेतकऱ्यांना सायंकाळी गावातच देण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी माती परीक्षण अहवालावर आधारीत पिकांचे खत व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले, ते म्‍हणाले की, पिक उत्‍पादन वाढीकरिता जमिनीचे आरोग्‍य सुधारणे गरजेचे असुन जमिनीचे सेंद्रीय कर्ब वाढी करिता सेंद्रीय खतांचा वापर करावा तसेच रासायनिक खतांना संतुलित वापर करण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. तसेच इफकोचे श्री.जगदीश देवतकर यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मातीचे नमुने घेण्‍याविषयी मार्गदर्शन केले. तर आत्माच्या श्रीमती स्वाती घोडके यांनी सोयाबीन उगवण शक्ती तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता रिलायंस फाऊंडेशचे श्री रामजी राऊत, विद्यापीठाचे श्री नितीन मोहिते आणि इफकोचे श्री तिवारी यांनी परीश्रम घेतले.