Wednesday, October 24, 2018

हवामान बदलामुळे कोरडवाहु शेतीवर मोठा परिणाम.....संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर

हवामान बदल व कोरडवाहु शेती यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन
हवामान बदलामुळे कोरडवाहु शेतीवर मोठा परिणाम होत असुन यामुळे अन्‍न सुरक्षेचे उदिष्‍टे साध्‍य करणे अवघड होणार आहे. विशेषत: मराठवाडयातील पीक पध्‍दतीत मोठा बदल झाला असुन अन्‍न व चारा दोन्‍हीचे उत्‍पादन देणारी खरिप व रबी ज्‍वारी लागवडी खालील क्षेत्रात घट झाली, यामुळे जनावरासाठीच्‍या चा-यांचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्‍यामुळे पशुंची संख्‍या कमी होत आहे, शेतक-यांना नियमित वर्षभर उत्‍पन्‍न देणारा दुग्ध व्‍यवसायावर परिणाम होत आहे तर जमिनीसाठी लागणारे शेणखताचे प्रमाण कमी होत आहे, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प व कृषि व शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या (भारत सरकार) कृषि विभागाच्‍या विस्‍तार संचालनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 23 ते 30 ऑक्‍टोबर दरम्‍यान हवामान बदल व कोरडवाहु शेती यावर आठ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर पुणे येथील भारतीय वेधशाळेचे शास्‍त्रज्ञ डॉ ओ पी श्रीजीथ, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, प्रशिक्षणाचे आयोजक मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ ए एस जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानाचा अल्‍पभुधारक व अत्‍यल्‍पभुधारक शेतक-यांच्‍या जीवनावर जास्‍त परिणाम होत आहे. दिवसेंदिवस पाण्‍याची पातळी खालवत असुन पाण्‍याचा प्रत्‍येक थेंबाचा कार्यक्षमरित्‍या शेतीत वापर करण्‍यावर भर द्यावा लागेल. कमीत कमी संरक्षित सिंचनाची सुविधा केल्‍यास पिकांच्‍या उत्‍पादनात मोठी वाढ होते, यासाठी जलसंधारणच्‍या विविध उपाय योजना करणे गरजेचे आहे. तसेच भारतीय वेधशाळेचे शास्‍त्रज्ञ डॉ ओ पी श्रीजीथ भाषणात म्‍हणाले की, संपुर्ण देशात तालुका पातळीवर हवामान अंदाज व कृषी सल्ला देण्याचे प्रयत्‍न चालु असुन प्रायोगिक तत्‍वावर काही भागात हा प्रकल्‍प कार्यान्‍वीत करण्‍यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आर एन खंदारे यांनी केले तर आभार डॉ जी आर हनवते यांनी मानले. सदरिल प्रशिक्षणात महाराष्‍ट्र, आंध्र प्रदेश, तेलगंणा व कर्नाटक राज्‍यातील कृषि विभागासह इतर विभागातील कृषि अधिकारी व शास्‍त्रज्ञांनी सहभाग नोंदविला आहेउदघाटन कार्यक्रमास विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.