Wednesday, August 21, 2013

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या चाकुर येथील पदव्‍युत्‍तर कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन संस्‍थाच्या शिक्षक व शिक्षकेत्‍तर पदास शासनाची मान्‍यता

महाराष्‍ट्र शासनाने दिनांक 21 ऑगस्‍ट 2013 रोजी संपंन्‍न झालेल्‍या मंत्री मंडळाच्‍या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत चाकुर, जिल्‍हा लातुर येथे असलेल्‍या पदव्‍युत्‍तर कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन संस्‍थेसाठी आवश्‍यक असलेली 21 शिक्षक वर्गीय व 17 शिक्षकेत्‍तर कर्मचारी पदे अशा एकूण 38 पदांना मान्‍यता दिली आहे. या 38 पदासाठी पहिल्‍या वर्षी रु 80­­­.51 लक्ष, दुस-या वर्षी रु 125­.72 लक्ष व तीस-या वर्षी रु 133.00 लक्ष असे एकूण आवर्ती खर्च 650.23 लक्ष व अनावर्ती खर्च रु 1977.63 लक्ष असा एकुण रु 2627.86 लक्ष इतक्‍या खर्चाच्‍या प्रस्‍तावास प्रशासकीय व वित्‍तीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. या मान्‍यतेसाठी महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि मंत्री मा. ना. श्री. राधाकृ‍ष्‍णजी विखे पाटील यांनी विशेष लक्ष दिले. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे यांनी यासाठी शासन दरबारी सातत्‍यपुर्ण प्रयत्‍न केले.
या महाविद्यालयात एम.बी.ए. (कृषि) हा दोन वर्षाचा पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम सन 2009-2010 या शैक्षणीक वर्षापासुन सुरु असुन प्रवेश क्षमता 35 आहे. अशा प्रकारची हि मराठवाडयातील कृषि विद्यापीठांतर्गत पहिलीच संस्‍था आहे. सदरील अभ्‍यासक्रमात कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन संबंधीत विषयांचा समावेश आहे. यामुळे या भागातील विद्यार्थ्‍यांना मोठा लाभ होणार असुन त्‍यांच्‍यातील कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन क्षेत्रातील कौशल्‍य गुणांना वाव मिळणार आहे. या महाविद्यालयाच्‍या पदांना मान्‍यता मिळाल्‍यामुळे शैक्षणीक कार्यक्रमास बळकटी प्राप्‍त होणार आहे.
यामुळे मराठवाडा विभागातील जनतेमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले असुन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि मंत्री मा. श्री. राधाकृ‍ष्‍णजी विखे पाटील व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे यांचे विविध स्‍तरातुन अभिनंदन करण्‍यात येत आहे. सदरील प्रस्‍तावाचा पाठपुरावा करण्‍यासाठी कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ. हेमंत पाटील यांनी परिश्रम घेतले.