Thursday, August 15, 2013

विद्यापीठाच्‍या संशोधन संचालकपदी डॉ दत्‍तप्रसाद वासकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्‍या संशोधन संचालकपदी डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. दिनांक 13 ऑगस्‍ट 2013 रोजी त्‍यांनी या पदाचा कार्यभार स्‍वीकारला. यानिमित्‍त संशोधन संचालनालयातर्फे स्‍वागताचा कार्यक्रम घेण्‍यात आला. डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी शिक्षण व संशोधनात विविध पदावरील 25 वर्षाचा अनुभव असुन डा‍ळिंब, अंजीर, सिताफळ इत्‍यादी फळपिकात त्‍यांनी विशेष संशोधन केले आहे. यापूर्वी त्‍यांनी पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद येथे शिक्षण संचालक या पदावर कार्य केले आहे. सत्‍काराला उत्‍तर देतांना ते म्‍हणाले की, या विभागातील शेतकरी तूर, कापूस व सोयाबीन पिकावरच अवलंबुन न राहता डाळिंब, अंजीर व सिताफळ यासारख्‍या कोरडवाहू फळपिकांची लागवड करुन आपली आर्थिक उन्‍नती केली पाहिजे. कृषि संशोधनाची गती वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संशोधन उपसंचालक डॉ. आनंद कारले यांनी केले. या प्रसंगी विद्यापीठातील विविध संशोधन केंद्राचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. या  नियुक्‍तीबद्दल विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ किशनरावजी गोरे यांनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे.