Saturday, August 17, 2013

शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा ……… डॉ. आर.पी. कदम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणीच्‍या तण व्‍यवस्‍थापन केंद्राद्वारे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचा उपक्रम म्‍हणुन पिंगळी ता. परभणी येथे खरीप मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. शेतकरी मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्रीमती उज्‍वलाताई खाकरे तर विशेष अतिथी म्‍हणून उपसरपंच श्री  अंगद अंबादासराव गरुड हे उपस्थित होते. या मेळाव्‍यात विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
      ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचा उपक्रम प्रभारी डॉ. आर. पी. कदम ह्यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा आणि कृषि विद्यापीठास वेळोवेळी शेतक-यांनी भेटी द्याव्‍यात असे आवाहन केले. शेतकरी मेळाव्‍यात डॉ. अ.पी. सुर्यवंशी यांनी एकात्मिक पिक रोग नियंत्रण ह्या विषयावर शेतक-यांना विस्‍तृत माहिती दिली. तसेच डॉ. डी. आर. कदम यांनी कापूस व सोयाबीन वरील किड व्‍यवस्‍थापनावर सविस्‍तर मार्गदर्शन केले. डॉ.यु.एन.आळसे यांनी ऊस लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करुन एकरी 100 टन ऊस उत्‍पादन करण्‍याचा शेतक-यांना मंत्र दिला. डॉ. अ. एस. जाधव यांनी एकात्मिक तण नियंत्रण या विषयांवर शेतक-यांना मार्गदर्शन करून विविध पिकांसाठी वापरण्‍यात येणा-या तणनाशकांची काळजी व त्‍याचा वापर कसा करावा या बाबतीत माहिती दिली. या प्रसंगी प्रत्‍यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन करण्‍यात आले. मेळाव्‍याचे सूत्रसंचलन श्री विकास हाके यांनी तर प्रा. एस. एल. बडगुजर यांनी उपस्थितांच आभार मानले. मेळाव्‍यास मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. तण नियंत्रण योजना केंद्राचे कृषिदुत श्री निलेश क्षिरसागर, राहुज मुवेक, सुनिल जावळे, सचिन नावकर, शाम शिंदे, शिवप्रसाद चव्‍हाण, महेश जुगनाके, प्रकाश खटींग, गजानन दासरवाड, शिवराज भांगे, भालचंद्र म्‍हस्‍के, विलास झाटे, दिनेश जगताप, प्रसाद धनवे, ओम देशमुख या विद्यार्थ्‍यांनी मेळावा यशस्‍वीतेसाठी परिश्रम घेतले.