Wednesday, July 3, 2019

वनामकृवितील कोरडवाहु संशोधन प्रकल्‍पास वसंतराव नाईक राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर

हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांच्‍या नावे जाहीर झालेला पुरस्‍कार ही विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब......कुलगुरू मा डॉ अशोक ढवण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पास नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक राष्‍ट्रीय पुरस्‍कार सन २०१८ साठीचा जाहिर करण्‍यात आला असुन दिनांक ३ जुलै रोजी तसे पत्र विद्यापीठास प्राप्‍त झाले, पुरस्‍काराबद्दल संशोधन प्रकल्‍पाच्‍या शास्‍त्रज्ञांचा कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील, डॉ अशोक जाधव, पुरस्‍कार प्राप्‍त शास्‍त्रज्ञ डॉ भगवान आसेवार, डॉ मदन पेंडके, डॉ आनंद गोरे, डॉ मेघा जगताप, डॉ पपिता गौरखेडे आदींची उपस्थिती होती.
पुरस्‍कार प्राप्‍त शास्‍त्रज्ञांचे अभिनंदन करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, नुकतेच आपण हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांची जयंती मोठया उत्‍साहात साजरी करून विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील विद्यापीठ प्रक्षेत्रावर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची महत्‍वाकांक्षी मोहिम हाती घेतली. कै वसंतराव नाईक यांच्‍या नावाचा वारसा लाभलेल्‍या कृषी विद्यापीठास त्‍यांच्‍याच नावे असलेला प्रतिष्‍ठीत राष्‍ट्रीय पुरस्‍कार विद्यापीठास जाहिर झाला, ही मोठी गौरवास्पद बाब आहे. मराठवाडयातील बहुतांश शेतीही कोरडवाहु असुन यासाठी अनुकूल कोरडवाहु शेती तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित करून त्‍याचा शेतक-यांमध्‍ये प्रसार व प्रचार केला. या तंत्रज्ञानाच्‍या आधारे मराठवाडयातील शेती बळकट करण्‍याचा प्रयत्‍न होत आहे, विद्यापीठाच्‍या इतिहासात प्रथमच भारतीय कृषी संशोधन परिषदेचा प्रतिष्‍ठीत असा पुरस्‍कार जाहिर झाला असुन हे विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या व शेतक-यांचा सन्‍मान असल्‍याचे ते म्‍हणाले.  
हा पुरस्‍कार कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या पथकास जाहिर झाला असुन यात डॉ भगवान आसेवार, डॉ मदन पेंडके, डॉ सुरेंद्र चौलवार, डॉ अनिल गोरे, डॉ मेघा जगताप, डॉ गणेश गायकवाड, डॉ पपिता गौरखेडे, डॉ रविंद्र चारी या शास्‍त्रज्ञांचा समावेश आहे. सदरिल संशोधन प्रकल्‍पाचे कार्य कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या नेतृत्‍वाखाली व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पुरस्‍काराचे वितरण भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या स्थापनादिनी दिनांक १६ जुलै रोजी नवी दिल्‍ली येथे माननीय केंद्रीय कृषिमंत्री यांच्‍या हस्‍ते होणार असल्‍याचे परिषदेने पत्राव्‍दारे कळविले आहे. 

अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्या उल्लेखनीय कार्याची दखल
सदरिल पुरस्‍कार अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या कोरडवाहु शेती मधील उल्‍लेखनीय संशोधन कार्य, तंत्रज्ञान विकास, व त्‍याचा शेतक-यांमधील प्रचार व प्रसार आदी कार्याची दखल घेऊन भारतीय कृषि संशोधन परिषदेने जाहिर केला आहे. या संशोधन कार्यात शेततळे व पाण्‍याचा पुर्नवापर, विहिर व कुपनलिका पुर्नेभरण, सोयाबीन करिता रूंद वरंबा व सरी पध्‍दती, मुलस्‍थानी जलसंधारण पध्‍दती, आंतरपीक पध्‍दती, आप्‍तकालीन पिक नियोजन, हवामान बदलानुरूप कोरडवाहु शेती संशोधन या बाबींचा प्रामुख्‍याने समावेश असुन हे तंत्रज्ञान प्रसारासाठी मोबाईल अॅप विकसित करण्‍यात आले आहे. प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन मराठवाडयातील आठही जिल्‍हयासाठी आप्‍तकालिन पिक नियोजन आराखडा तयार करण्‍यात आला असुन शासनस्‍तरावर त्‍याची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्‍पास (पोक्रा प्रकल्‍प) या संशोधन केंद्रामार्फत तंत्रज्ञानात्‍मक पाठबळही पुरविण्‍यात येते. प्रकल्‍पामार्फत हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषी उपक्रम हा परभणी तालुक्‍यातील मौजे बाभळगांव व उजळांबा या गावातील शेतक-यांच्‍या शेतावर संशोधनात्‍मक प्रात्‍यक्षिके राबविण्‍यात येऊन शेतक-यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्‍यात येत आहे. या संशोधन केंद्रामार्फत कोरडवाहु शेती निगडीत बावीस तंत्रज्ञान शिफारसी मान्‍य करण्‍यात आल्‍या असुन विविध तंत्रज्ञानाच्‍या प्रसारासाठी घडीपत्रिका, पुस्तिका, वार्तापत्र लेख आदी प्रकाशित करण्‍यात आले आहे.