Tuesday, July 16, 2019

कमी पर्जन्‍यमानाच्‍या परिस्थितीत आपत्‍कालीन पीक नियोजन करावे....वनामकृविचे शास्‍त्रज्ञ डॉ यु एन आळसे यांचा सल्‍ला

यावर्षी मराठवाडयात सरासरीच्या तुलनेत केवळ ३४ टक्केच पाऊस पडला असुन सर्वदुर सारखा झालेला नाही, त्यामुळे पीक परिस्थिती समाधानकारक नाही. काही ठिकाणी अजुन पेरण्या बाकी असुन पावसाचा दीड महिन्याचा कालावधी जवळपास होत आला आहे. अशा परिस्थितीत पर्यायी पीके व पीकपध्दती आपत्कालीन पीक नियोजनात समाविष्ठ करुन पेरणी करणे सोईस्कर होईल, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषि विद्यावेत्तातथा व्यवस्थापक डॉ. यु.एन. आळसे यांनी दिला आहे. या पुढील काळात पेरणी योग्य पावसाच्या आगमनानुसार पीकांची पेरणी करावी. आता १६ ते ३१ जुलै दरम्यान सुर्यफुल, बाजरी, सोयबीन + तुर, बाजरी + तुर, एरंडी, कारळ, तीळ, हुलगा, मटकी आदी पीकांची पेरणी करावी. कमी कालावधीच्‍या वाणाची निवड करावी, यात तुर (बीडीएन-७११), सोयबीन (एमएयुएस-७१, जेएस-९३०५), बाजरी (एबीपीसी-४-३, धनशक्ती), सुर्यफुल (एलएस-११, ३५) वाणांचा वापर करावा. तसेच १ ते १५ ऑगस्ट दरम्‍यान बाजरी, सुर्यफूल, एरंडी, तीळ, एरंडी अधिकधने, एरंडी + तुर आदी पीकांची पेरणी करावी. तर १६ ते ३१ ऑगस्ट दरम्‍यान बाजरी, सुर्यफुल, एरंडी, तीळ, एरंडी + तुर, एरंडी + धने आदींची लागवड करावी. मुलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पध्दतीचा अवलंब करावा. ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, अशा ठिकाणी अरुंद ओळीच्या खरीप सर्वच पीकांमध्ये ३-४ ओळी नंतर एक सरी काढावी व कापुस व तुर रुंद ओळीतील पीकांमध्ये एक तास आड करुन सरी काढावी जेणेकरुन पडलेला पाऊस सरीमध्ये साठून पीकाच्या वाढीसाठी उपयोगी पडेल, असा सल्‍ला त्‍यांनी दिला आहे.