Wednesday, September 25, 2019

विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमांतर्गत विद्यापीठ शास्‍त्रज्ञाची टीम पूर्णा तालुक्यात


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी हा उपक्रम दिनांक 19 सप्‍टेबर ते 7 ऑक्‍टोबर दरम्यान परभणी व हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांर्गत दिनांक 19 सप्‍टेबर रोजी विद्यापीठ शास्त्रज्ञांचा चमू व कृषी विभाग अधिकारी यांनी पूर्णा तालुक्यातील दस्तापूर, कमलापूर, मजलापुर, खडाळा माख्णी, धानोरा (काळे), कानडखेडा या गावांतील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रास भेट व गटचर्चा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांच्‍या पिक परिस्थिती व गरजेनुसार मार्गदर्शन करण्‍यात आले. मौजे दस्तापूर येथील श्री. रामानंद कारले यांच्या गांडूळ खत निर्मिती केंद्र व सेंद्रिय डाळिंब बागेला भेट देऊन आयोजित चर्चासत्रात उपस्थित शेतकऱ्यांना सद्यपरिस्थितीतील कीड-रोग व्‍यवस्‍थापन, रब्बी नियोजन, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री शेतकरी पेन्शन योजना आदीं विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दस्तापूर येथील श्री माणिक कारले, मजलापुर येथे श्री बाळासाहेब हिंगे व मौजे कमलापूर येथील श्री. गजानन सूर्यवंशी यांच्या कापूस पिकास भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. मौजे खंडाळा येथे शेतकरी चर्चासत्रात उपस्थित शेतकर्‍यांना कीटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी, कापूस व हळद किड व रोग व्यवस्थापन, रब्‍बी नियोजन याविषयी तसेच यावेळी उपस्थित शेतकर्‍यांना टाटा रॅलीस कंपनी तर्फे कीटकनाशक संरक्षण किट वाटप करण्यात आली. यावेळी कीटकनाशक हाताळताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती मोहिमेचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. एस. बी. आळसे व विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ यू एन आळसे यांच्या हस्ते करण्यात आले.
मौजे माखणी व धानोरा (काळे) येथील विद्यापीठ व महाबीज यांच्याद्वारे विकसित नांदेड 44 बीटी कपाशी वाणाच्या प्रक्षेत्रास भेट देऊन शेतकऱ्यांना विविध किडींची व मित्र किडीची प्रत्यक्ष शेतात ओळख करून देण्यात आली तसेच फवारणीसाठी कीटकनाशक निवडताना महत्त्वाच्या सूचना देण्‍यात आलया. मौजे कानडखेड येथील शेतकरी श्री. अमृत कदम यांच्या शेतातील हळद पिकास भेट देऊन कंदमाशी, खोडकिडा, करपा, कंदकूज याविषयी ओळख करून व्यवस्थापन विषयी माहिती देण्यात आली. उपस्थित शेतकर्‍यांना चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या ग्राम बीजोत्पादन, प्रक्रिया उद्योग, कपाशी कीड व्यवस्थापन याविषयीच्या प्रश्नांची सखोल उत्तरे देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मोहिमेअंतर्गत तालुक्यातील २०० ते २५० शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषी विभाग अधिकारी यांच्याशी संवाद साधला. सदर कार्यक्रमास विद्यापीठाच्‍या चमूमध्ये चमू प्रमुख व विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ यु एन आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री एस बी आळसे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री सागर खटकाळे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री के आर सराफ, रोग शास्त्रज्ञ डॉ एम एस दडके, कीटकशास्त्रज्ञ श्री डी डी पटाईत, तालुका कृषी अधिकारी श्री. नितीन देशमुख, मानवत तालुका कृषी अधिकारी श्री. पी. एच. कच्छवे, पाथरी तालुका कृषी अधिकारी श्री. व्‍ही. टी. शिंदे व विविध मंडळ कृषी अधिकारी यांनी सहभाग घेतला.