Saturday, September 28, 2019

गुणवंत विद्यार्थ्‍यांचा कृषी अभ्‍यासक्रमाकडे वाढता कल......कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात आयोजित प्रथम वर्षात नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांच्‍या स्‍वागत समारंभात प्रतिपादन

कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांना शासकीय क्षेत्रात, बॅकिंग व खासगी शेती निविष्‍ठाच्‍या कंपनी मध्‍ये रोजगाराच्‍या संधी आहेत. परंतु कृषि व कृषी सलंग्‍न उद्योगात स्‍वयंरोजगाराच्‍या अमर्याद संधी उपलब्‍ध असुन यासाठी विद्यार्थ्‍यींनी उद्योजकता विकासाकडे लक्ष देण्‍याची गरज आहे. यावर्षी मोठया प्रमाणात कृषि व कृषि संलग्‍न अभ्‍यासक्रमात गुणवंत विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेतला असुन गुणवंत विद्यार्थ्‍यांचा कृषी अभ्‍यासक्रमाकडे कल वाढत आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयात कृषि पदवीच्‍या प्रथम वर्षात नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत समारंभ व उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २५ सप्‍टेबर रोजी करण्‍यात आले होते, त्‍या प्रसंगी ते अध्‍यक्षीय भाषणात बोलत होते. व्‍यासपीठावर परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुकाराम तांबे, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍नस्‍तर शिक्षण) डॉ डि एन धुतराज, शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, बहुतांश कृषीचे विद्यार्थ्‍यी हे मध्‍यमवर्गीय व शेतकरी कुटूंबातुन आलेले असतात, प्रतिकुल परिस्थितीत देखिल अनेक कृषि पदवीधरांनी विविध क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्‍यांचा व्‍यक्‍तीमत्‍व विकास होत असतो, महाविद्यालयातील वातावरण व शिक्षकांचे संस्‍कारामुळे विद्यार्थ्‍यी घडत असतात. शिक्षणामुळेच आपणास प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्‍याचे सामर्थ्‍य प्राप्‍त होते.    

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन संजय येवले व वैभव ठोंबरे यांनी केले तर आभार प्रा विजय जाधव यांनी मानले. कार्यक्रमास म‍हाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला, तसेच कृषि अभ्‍यासक्रमाबाबत शैक्षणिक बाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यांचे पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते.