Wednesday, September 25, 2019

विद्यापीठ आपल्या दारी उपक्रमांतर्गत गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांशी विद्यापीठ शास्त्रीज्ञांचा संवाद व मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषी विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने 19 सप्‍टेबर पासुन परभणी व हिंगोली जिल्‍हयातील विविध गावांमध्‍ये विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमात विशेष संरक्षण मोहिम कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी दिनांक 28 सप्‍टेंबर रोजी गंगाखेड तालुक्‍यातील मौजे कौडगाव, शिवाजी नगर, इसाद आणि गंगाखेड येथील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर प्रत्‍यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधुन मार्गदर्शन केले. यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एस जी पुरी, प्रा पी के वाघमारे, तालुका कृषी अधिकारी श्री निरस, मंडळ कृषी अधिकारी श्री देशमुख आदींनी शेतक-यांशी सुसंवाद साधुन शेतीविषयक शंकाचे समाधान केले.
मोहिमेंतर्गत मौजे कौडगाव येथे शेतक-यांना मार्गदर्शन करतांना प्रा. वाघमारे यांनी पिकांना रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळुन सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, योग्य मशागत करून जमिनीची अन्‍नद्रव्‍यांची भूक भागवावी असे सांगुन कापूस सोयाबीन पिकाची सद्यपरिस्थितीत घ्‍यावयाची काळजी रबी हंगामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. डॉ. एस. जी. पुरी यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याबाबत माहिती देऊन मका पिकावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. यावेळी महिला प्रगतशील शेतकरी सौ जयश्री जामगे सह अनेक ग्रामस्थ सहभागी होते. मौजे इसाद येथे श्री. रामप्रसाद सातपुतेश्री.राजाभाऊ सातपुते यांच्या पिकांची पाहणी करून उपस्थित शेतकरी बांधवाच्‍या शेती विषयक समस्यांचे चर्चेव्‍दारे समाधान केले तर गंगाखेड येथील शेतकरी श्री पंडित चौधरी श्री महाजन तसेच मौजे शिवाजीनगर येथील शेतकरी श्री काशिनाथ निळे यांच्या शेतावर भेट देऊन कापूस पिकावरील किड व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी कृषी विभागातील श्री. मुंडे, श्री. कच्छवे, श्री राठोड, श्री राऊत, श्री सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले.