Wednesday, September 18, 2019

मराठवाडयातील दुष्‍काळ मुक्‍तीसाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज......विधानसभा सदस्‍य मा आमदार श्री अमित देशमुख

वनामकृवितील लातुर येथील कृषि महाविद्यालयात आयोजित रबी पीक शेतकरी मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद, महिलांचा उल्‍लेखिनीय सहभाग

मराठवाडयात सातत्‍याने पडत असणा-या दुष्‍काळामुळे शेतकरी त्रस्‍त असुन मराठवाडा दुष्‍काळ मुक्‍त करण्‍यासाठी शासन, शेतकरी, कृषी विभाग व कृषि विद्यापीठ सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. इस्राईल सारख्‍या देशात महाराष्‍ट्र पेक्षाही कमी पाऊस पडतो, तरीही तो देश जगात कृषि उत्‍पादनात अग्रेसर आहे. इस्‍त्राईल तंत्रज्ञानाचा अभ्‍यास शास्‍त्रज्ञांनी करून ते तंत्रज्ञान राज्‍यातील शेतक-यांना देण्‍याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन लातुर विधानसभा सदस्‍य माननीय आमदार श्री अमित देशमुख यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी लातुर येथील कृषि महाविद्यालयात आयोजित रबी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले हे होते तर व्‍यासपीठावर लातुर जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री डी एस गावसाने, आत्‍माचे प्रकल्‍प संचालक डॉ दिनकर जाधव, प्रगतशील शेतकरी श्री राजकुमार बिराजदार, प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे, प्राचार्य डॉ हेमंत पाटील, प्राचार्य डॉ भगवान इंदुलकर, प्राचार्य डॉ व्‍यंकट जगताप, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, डॉ अरूण कदम, डॉ दिगांबर चव्‍हाण, डॉ सचिन डिग्रसे, प्रगतशील शेतकरी श्री अशोकराव चिंते, प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती मालनताई राऊत, डॉ महारूद्र घोडके, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात माननीय आमदार श्री अमित देशमुख पुढे म्‍हणाले की, शेतक-यांनी आपल्‍या शेतीला शेतीपुरक व्‍यवसायाची जोड दयावी. सामान्‍य शेतकरी केंद्रबिंदु ठेवुन शासनाचे कृषि धोरण पाहिजे, गाव आधारित पिक विमा योजना राबवावी लागेल. शेतमालाची आधारभुत किंमती वाढविण्‍याची गरज असुन शेतकरी आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी ठोस शासकिय धोरण आखावे लागेल. ऊसापासुन इथेनॉल व वीज निर्मितीवर भर द्यावा लागेल, साखर हा उपपदार्थ झाला पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ विविध माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञान विस्‍ताराचे कार्य करित असुन शेतक-यांनी कृषि तंत्रज्ञानाची माहितीसाठी कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांशी सातत्‍याने संपर्कात रहावे. शेतक-यांनी एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करावा. गटशेतीही काळाची गरज असुन शेतमाल विक्रीसाठी शेतक-यांनी एकत्रित येण्‍याची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले.
जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री डी एस गावसाने यांनी आपल्‍या भाषणात शेतक-यांनी कृषि विभागाच्‍या विविध योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले तर आत्‍माचे प्रकल्‍प संचालक डॉ डि एल जाधव यांनी शेतक-यांनी संघटित होऊन शेती करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन केलेप्रगतशील शेतकरी श्री राजकुमार बिराजदार,श्री अशोकराव चिंते, महिला शेतकरी श्रीमती मालनाताई राऊत यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे व डॉ जयश्री देशमुख यांनी केले तर आभार डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी मानले. तांत्रिक सत्रात हवामान बदलावर आधारीत पिक पध्‍दतीवर डॉ भगवान आसेवार, सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञानावर डॉ प्रशांत पगार, गळीत धान्‍य लागवड तंत्रज्ञानावर डॉ महारूद्र घोडके तर रबी हंगामातील किडी व्‍यवस्‍थापनावर डॉ संजय बंटेवाड आदी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तर चर्चासत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या विविध शेतीविषयी शंकांचे निरासरण केले. तसेच तुती पिकावरील ऊझी माशीचे व्‍यवस्‍थापन या घडीपत्रिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर काही निवडक शेतक-यांना विद्यापीठ विकसित विविध पिकांचे बियाणे व दोन हजार वृक्ष वाटप करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ शिफारसीत तंत्रज्ञानावर आधारित व इतर संलग्‍न विभागांचे प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्यात विद्यापीठ संशोधित बियाणांची विक्रीस शेतक-यांचा मोठा प्रतिसाद होता. मेळाव्‍यास शेतकरी बांधवासह बचत गटांच्‍या शेतकरी महिलांचा उल्‍लेखनिय सहभाग होता.