Wednesday, November 27, 2019

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने फळपिके व प्रक्रिया उद्योगास प्रोत्‍साहन देणे गरजेचे ...... डॉ दत्‍तप्रसाद वासकर


वनामकृवित आयोजित एकात्मिक शेती पध्‍दतीवरील दहा दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप
शेतकऱ्यांचे उत्पादन उत्पन्न वाढीच्या दृष्टीने एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करणे त्यासोबत फळबाग लागवड करुन प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन देणे गरजेचे असल्‍याचे प्रतिपादन संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील  अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने आयोजीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी एकात्मिक शेती पद्धती या विषया वरील भारतीय शेती अनुसंधान परिषदे द्वारे प्रायोजित दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोह दि.२७ नोव्‍हेबर रोजी संपन्न झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ वासुदेव नारखेडे उपस्थित होते.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात एकात्मिक शेती पध्‍दतीवरील विविध विषयावर व्याख्याने तसेच संबंधीत प्रक्षेत्रास दिलेल्या भेटी देण्‍यात आल्‍या. या पीक पीक पध्दती, एकात्मिक शेती पध्दतीमध्ये रेशीम उद्योग, मधुमक्षीका पालन, अळींबी उत्पादन तंत्रज्ञान, पशुपालन दुग्धव्यवसाय, कुक्कूटपालन, तण व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, किड रोग नियंत्रण, मृद जल व्यवस्थापन, जलपुनर्भरण, सेंद्रीय शेती, फळपिके व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आदी विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींची विद्यापीठातील विविध प्रक्षेत्रावर भेटी आयोजीत करण्यात आल्या त्याद्वारे एकात्मिक शेती पध्दतीमध्ये विविध घटकांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच प्रत्यक्ष प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देण्‍यात आल्‍या. प्रशिक्षण कार्यक्रमास महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यांतील २२ शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रास्‍ताविक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनिता पवार यांनी केले तर आभार डॉ. गौतम हनवते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहसमन्वयक डॉ. मदन पेंडके, डॉ. विशाल अवसरमल, डॉ. मिर्झा, श्री. दिपरत्न सूर्यवंशी, सौ. सारिका नारळे, श्री. महेबूब सय्यद, श्री. मोरेश्वर राठोड, श्री. सुमित सुर्यवंशी आणि श्री. दिपक भुमरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी व प्रशिक्षणार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.