Sunday, August 22, 2021

मानवी जीवन व पर्यावरणाच्‍या रक्षणाकरिता वृक्ष संवर्धनाशी स्‍वत:ला भावनिकरित्‍या बांधुन घ्‍या ........ कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित वृक्षवंदन – रक्षाबंधन उपक्रम साजरा

नागरिकांमध्‍ये वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाबाबत स्‍वयंप्रेरणा व दायित्‍व भावना निर्माण व्‍हावी म्‍हणुन परभणी जिल्‍हयात वृक्षवंदन - रक्षाबंधन या सप्‍ताहाचे दिनांक २२ ऑगस्‍ट ते ३० ऑगस्‍ट आयोजन करण्‍यात आले असुन यानिमित्‍त दिनांक २२ ऑगस्‍ट रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात हा उपक्रम राबविण्‍यात आला.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी श्रीमती उषाताई ढवण, पुरातन वास्‍तु अभ्‍यासक व तज्ञ श्री मल्‍हारीकांत देशमुख, डॉ अनिल दिवाण, डॉ सुभदा दिवाण, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, माजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, वृक्ष लागवड अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे, ओंकार ग्राफीक्स चे श्री संजय ठाकरे, श्री दिवाकर काकडे, डॉ वडणेरकर, डॉ राजेश क्षीरसागर, डॉ प्रविण वैद्य, डॉ टेकाळे, डॉ चंद्रशेखर अंबाडकर, डाॅ मिनाक्षी पाटील, डॉ विजय जाधवडॉ फरिया खानडॉ अंबिका मोरे आदीसह शहरातील नागरीक उपस्थित होते.

उपक्रमाची सुरूवात कुलगुरू यांच्‍या सुविद्य पत्‍नी श्रीमती उषाताई ढवण यांच्‍या हस्‍ते वडाच्‍या झाडाचे पुजनाने करण्‍यात येऊन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते वडाच्‍या झाडास राखी बांधुन करण्‍यात आली, नंतर उपस्थित मान्‍यवरांनीही विद्यापीठ परिसरातील वृक्षास राखी बांधुन या उपक्रमात सहभाग घेतला.

याप्रसंगी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, भाऊ व बहिण अतुट बंधन अधिक दृढ होण्‍याकरिता आपण रक्षाबंधन साजरा करतो, यात बहिण व भाऊ परस्‍परांचे संरक्षण करण्‍याचे दायित्‍व अपेक्षित असते. त्‍याचप्रमाणे वृक्षालाही आपण राखी बांधुन, लहानपणी त्‍यांचे संवर्धन करू, हीच वृक्ष भविष्‍यात मानवाचे व पर्यावरणाचे रक्षण करणार आहेत. वृक्षास राखीपुर्णिमेच्‍या दिवसी प्रतिकात्‍मकरित्‍या राखी बांधुन वृक्ष संवर्धनाशी आपण भावनिकरित्‍या बांधुन घेत आहोत. सर्व नागरिकांनी वृक्ष संवर्धनाच्‍या प्रक्रियेत सर्वांनी सामिल व्‍हावे, ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड व संवर्धनाचा वसा विद्यापीठाने घेतला असुन गेल्‍या तीन वर्षाच्‍या कार्यकाळात विद्यापीठ अंतर्गत मराठवाडयातील महाविद्यालये, संशोधन केंद्रे व कृषि विज्ञान केंद्र परिसरात साधारणत: दहा लाख वृक्षाची लागवड व संवर्धन करण्‍यात आले. परभणी विद्यापीठ परिसरात पाचशे पेक्षा जास्‍त वडाच्‍या झाडाचे लागवड करण्‍यात आली असुन वडाच्‍या झाडाचे आयुष्‍य मोठे असते, यामुळे पक्षी वैभव वाढीस लागणार आहे. विद्यापीठ ऑक्सीजन हॅब होत आहे, भविष्‍यात परिसर गर्द वनराईने नटलेला असेल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

याप्रसंगी श्री मल्‍हारीकांत देशमुख म्‍हणाले की, कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर प्राणवायुचे मानवी जीवनातील महत्‍व अधोरेखित झाले, मानवास प्राणवायुची पुर्तता वृक्ष पासुनच होते. मानवाचे जीवन सुरक्षित ठेवण्‍यासाठी वृक्षास करून आपण प्राणवायु दे ही मागणी राखी बांधुन करणार असुन यात पुरूष व महिलांनीही सहभाग घ्‍यावा. सर्व वृक्षप्रेमी एकत्रित कार्य करून आपले ऋण म्‍हणुन वृक्षाचे पुजन करू. ही सुरूवात असुन संपुर्ण परभणी जिल्‍हयात ही मोहिम राबविण्‍यात येणार आहे. ज्‍याप्रमाणे रक्षाबंधन करून भाऊ आपल्‍या बहिणीच्‍या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो अगदी त्‍याचप्रमाणे नागरिकांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्‍वीकारावी असा या उपक्रमा मागचा हेतू आहे. वृक्षांचे रक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करणे व वृक्षांप्रती दायित्‍वाची भावन रूजवण्‍यासाठी वृक्ष वंदन -  रक्षा बंधन अभियान महत्‍वाचे ठरणार आहे.

दिनांक २३ ते ३० ऑगस्‍ट या सप्‍ताहाचे आयोजन पुरातन वास्‍तु अभ्‍यासक व तज्ञ श्री मल्‍हारीकांत देशमुख यांच्‍या संकल्‍पनेमधुन करण्‍यात आले आहे. या उपक्रमांतर्गत रक्षा बंधनाचे औचित्‍य साधुन जिल्‍हयातील शाळा, महाविद्यालये येथे वृक्षांची लागवड करून त्‍यांची जोपासना करण्‍यात येणार आहे. अभियानातुन लोकसहभाग व जनप्रबोधन करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येऊन वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची व्‍याप्‍ती वाढविण्‍याचा उद्देशाने अभियान जिल्‍हाभरात राबविण्‍यात येणार आहे.