Sunday, August 1, 2021

हळदीवरील कंदमाशीच्या प्रादुर्भावाकडे वेळीच लक्ष द्या

वनामकृविचा सल्‍ला


सद्यपरिस्थितीमध्ये हळदीच्‍या शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्याकरिता वेळीच लक्ष देऊन पुढील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्‍या वतीने देण्‍यात आला आहे.

कंदमाशी कीड - कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात. या किडीच्या अळ्या उघड्या गड्डयामध्ये शिरून त्यांच्यावर उपजीविका करतात. अशा गड्डयामध्ये नंतर बुरशीजन्य रोगांचा आणि काही सुत्रकृमींचा शिरकाव होतो. त्यामध्ये खोड व गुद्दे मऊ होतात व त्यांना पाणी सुटून ते कुजतात. जास्ती दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. वेळीच लक्ष दिले नाही तर या कीडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. ही कीड ऑगस्ट ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.

उपाय योजना : 

ऑगस्ट ते ऑक्टोंबर महिन्‍याच्‍या दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३०% प्रवाही ) १० मि.ली. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे. उघडे पडेलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. तसेच जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात करावी. तसेच कंदमाशी मुळे कंद कूज झाली असल्यास मुख्य किटकनाशकासोबत एका बुरशीनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने मिसळून आळवणी करावी.

हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

सदरिल शिफारसी कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील हळद संशोधन केंद्राने केलेल्‍या असुन हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.

वरील प्रमाणे कंदमाशीच्या प्रादुर्भावास वेळीच लक्ष देऊन भविष्यात होणारे नुकसान टाळावे, असा सल्‍ला कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्‍या वतीने देण्‍यात आला आहे. अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचा दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९००० यावर संपर्क करावा.

संदर्भ : वनामकृवि संदेश क्रमांक- ०४/२०२१ ( ०१ ऑगस्ट २०२१)