छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी दिनांक २० ऑगस्ट रोजी केलेल्या हल्ल्यात नांदेडचे सुपुत्र आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे शहीद झाले. हल्ल्यात आयटीपीबीचे दोन अधिकारी शहीद झाले. नक्षलवद्यांनी कडेमेटा कॅम्पपासून ६०० मीटर अंतरावर हा हल्ला केला. या घटनेने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कै सुधाकर शिंदे हे मुखेड तालुक्यातील बामणी इथले रहिवासी होते, ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते, परभणी कृषि महाविद्यालयाचे १९९६ च्या बॅचचे विद्यार्थी होते. घरची हालाखीची परिस्थिती असतांनाही स्वत: कष्ट करून शिक्षण पुर्ण केले. सन २००२ साली पहिल्याच स्पर्धा परीक्षेत यश मिळवत पास झाले. २००४ ते २०१३ या दरम्यान देशात विविध राज्यात सेवा बजावली. २०१३ ते २०१९ या दरम्यान राष्ट्रीय आपदा प्राधिकरणमध्ये पथकप्रमुख म्हणुन नेमणुक केली. डिसेंबर २०१९ पासुन कै सुधाकर शिंदे छत्तीसगढ येथील नारायणपुर येथे पोलिस उपाधिक्षक म्हणुन कार्यरत होते. आयटीबीपीच्या ४५ व्या बटालियनमध्ये ते सेवेत होते.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांची श्रद्धांजली
विद्यापीठाच्या वतीने शहिद कै सुधाकर शिंदे यांना श्रध्दांजली वाहतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले, नांदेडचे सुपुत्र, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, व आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट कै सुधाकर शिंदे यांना नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला, विनम्र व स्वकष्टातुन यश संपादन केलेल्या शहिद कै सुधाकर शिंदे यांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, संपूर्ण विद्यापीठ परिवार शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.