सद्यपरिस्थितीत कपाशी पिकाचे व्यवस्थापनाबाबत विद्यापीठाचा सल्ला
कपाशीचे पीक सध्या पाते
व फुल लागण्याच्या अवस्थेत आहे तसेच जूनमध्ये लवकर लागवड केलेल्या कपाशीमध्ये बोंड
परीपक्वतेच्या अवस्थेत आहेत. सध्या वातावरणामध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. कधी
तापमानात वाढ होत आहे तर कधी सलग ५-६
दिवस पावसाचे वातावरण होत आहे. अशा
हवामान बदलामुळे कपाशीत पातेगळ झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रसशोषण करणा-या कीडी जसे की मावा, तुडतुडे,
फुलकीडे यांचा ही मोठ्या प्रमाणावर
प्रादुर्भाव आढळून येत आहे व काही ठिकाणी बोंडअळीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. येणाऱ्या
काळात आकस्मिक मर, जिवाणूजन्य करपा सुध्दा येण्याची शक्यता आहे, तरी त्या करीता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील कृषि विद्यावेत्ता डॉ जी डी गडदे व किटकशास्त्रज्ञ
प्रा डी डी पटाईत यांनी पुढील उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.
रसशोषक किडी विशेषत: फुलकिडे व्यवस्थापनाकरिता निंबोळी अर्क ५ टक्के किंवा फिप्रोनील ५ टक्के - ३० मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६०० मिली किंवा स्पिनेटोरम ११.७ टक्के - ८ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १६० मिली किंवा बुप्रोफेझीन २५ टक्के - २० मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ४०० मिली फवारावे. यापैकी कोणत्याही किटकनाशकांची फवारणी करावी.
जिवाणूजन्य करपा रोग दिसुन येत असे तर कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० टक्के २५ ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यात मिसळुन एकरी ५०० ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी.
काही ठिकाणी कपाशीमध्ये आकस्मिक मर ही विकृती दिसून येत आहे. त्याकरिता पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. शेतातील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. लवकरात लवकर १.५ किलो युरिया अधिक १.५ किलो पालाश (पोटॅश) अधिक २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली आळवणी करावी. किंवा १ किलो १३:००:४५ अधिक २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.
कपाशीतील नैसर्गिक फुलगळीचे व्यवस्थापन करण्यासाठी नॅपथेलिन अॅसीटीक अॅसीड (NAA) २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कापूस पिकामध्ये दोन महिन्यानंतर नत्रयुक्त खताची मात्रा देण्यासाठी युरिया १ बॅग किंवा अमोनियम सल्फेट २ बॅग प्रति एकर पेरून द्यावे. तसेच कापूस पिकामध्ये १.५ टक्के युरिया (१५० ग्रॅम) किंवा २ टक्के डायअमोनिअम फॉस्फेट (२०० ग्रॅम) अधिक ५० ग्रॅम सुक्ष्म अन्नद्रव्य प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.
अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दुरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० यावर संपर्क साधावा.
संदर्भ - कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि,
परभणी संदेश क्रमांक: ०६/२०२१ (२४ ऑगस्ट २०२१)