Friday, August 27, 2021

सद्यस्थितीत सोयाबीनवरील किड व रोग व्‍यवस्‍थापन करा

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचा सल्‍ला

छायाचित्र - शेंगा करपा


सध्या सोयाबीन वर चक्री भुंगा, खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा- लष्करी अळी) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तसेच येणाऱ्या काळात रिमझिम पावसामुळे शेंगा लागण्याच्या अवस्थेत शेंगा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन पुढील प्रमाणे कीड व रोगांचे व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ जी डी गडदे व किटकशास्‍त्रज्ञ प्रा डी डी पटाईत यांनी दिला आहे.

पाने खाणाऱ्या व खोडकिडीच्या अळी करीता क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के हे किटकनाशक ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लँम्बडा सायहँलोथ्रिन ९.५ टक्के (संयुक्त कीटकनाशक) हे २.५ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ५० मिली  किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ टक्के अधिक लँम्बडा सायहँलोथ्रिन ४.६ टक्के हे ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली (संयुक्त कीटकनाशक) किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के (संयुक्त कीटकनाशक) हे ७ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १४० मिली फवारावे. सदरिल कीटकनाशक सर्व प्रकारच्या अळी (खोडकीडी व पाने खाणा-या अळ्या) करीता काम करतात म्हणून कीडीनुसार वेगळे किटकनाशक फवारणी करण्याची आवश्यकता नाही.

पानावरील ठिपके व शेंगा करपाकरीता टेब्युकोनॅझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) हे २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ टक्के  हे १२.५ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर २५० मिली फवारावे.

अधिक माहितीसाठी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२ २२९००० यावर संपर्क साधवा.

संदर्भ - संदेश क्रमांक: ०७/२०२१ (२७ ऑगस्ट २०२१), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी.