शास्त्रज्ञांनी ग्रामीण महिलांशी साधला संवाद
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प गृहविज्ञान, रिलायन्स फाउंडेशन ग्रुप आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परभणी जिल्ह्यातील मिरखेल आणि नांदखेडा या गावच्या महिलासाठी नुकतेच दोन दिवसीय ऑडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पच्या शास्त्रज्ञांनी ग्रामीण महिलांकरिता उपयुक्त गृहविज्ञान तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ऑडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते.मौजे मिरखेल तालुका पूर्णा येथील
महिलांनी प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला. प्रकल्पाद्वारे महिलांसाठी
श्रम व वेळ बचतीची शेती कामांमधील अनेक साधने विकसित केलेली आहेत, यांच्या
वापराबाबत डॉ. जयश्री रोडगे यांनी मार्गदर्शन केले तर वस्त्र व परिधान अभीकल्पना
विभागाच्या मार्फत शेती कामांमध्ये विशेषतः पीकावर कीटकनाशक, रोगनाशक तसेच
तणनाशकांची फवारणी करताना विविध प्रकारचे वस्त्र यांमध्ये कोट घरच्या घरी कसा तयार
करावा आणि त्याचा आवर्जून फवारणी करताना वापर करावा याबाबत प्रकल्पाच्या घटक
सामन्विका डॉ. सुनिता काळे यांनी मार्गदर्शन केले. कोरोना काळात विविध व्यवसायातील
समस्या आणि त्याचे निराकरण यावर
बोलताना डॉ शंकर पुरी यांनी टिकाऊ वस्तू किंवा दिर्घकाळ टिकणा–या वस्तूंमध्ये गुंतवणूक
करून आपला व्यवसाय उभारावा असे स्पष्ट केले. मिरखेल येथून सहभागी झालेल्या
महिलांमधून पार्वती विष्णू घोंगडे यांनी कोरोना मधील आहार व काळजी कशी घ्यावी,
मीना कनकुटे यांनी बचत गटांमध्ये रोजगार निर्मितीच्या नवीन संधी, छाया कनकुटे यांनी आहार कसा असावा तर ज्योती चौरे यांनी महिलांचे काबाडकष्ट कमी
करण्यासाठी उपाययोजना याबाबत शास्त्रज्ञांनी त्यांचे शंका समाधान केले.
मौजे
नांदखेडा तालुका परभणी येथील महिलांशी संवाद साधताना मानव विकास व कौटुंबिक अभ्यास
या विषयाच्या शास्त्रज्ञा प्रा. नीता गायकवाड यांनी कोरोना महामारी मध्ये कुटुंबाविषयी
महिलांची जबाबदारी आणि मानसिक स्वास्थ्य यावर संबोधताना प्रत्येकाने आपल्या जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन प्राणायाम, ध्यानधारणा करावी आणि ज्या कार्यामध्ये आनंद मिळतो ते कार्य जास्तीत जास्त करावे व स्वतःला
त्यात गुंतवून ठेवावे असा सल्ला दिला तर शारीरिक स्वास्थ्यासाठी योग्य
आहार यावर माहिती देताना अन्नशास्त्र व पोषण विभागाच्या संशोधन सहाय्यक ज्योत्स्ना
नेर्लेकर यांनी प्रकल्पांतर्गत विकसित विविध पोषक पदार्थ
बनविण्यासाठी लागणारे साहित्य, पाककृती व त्याचा स्वास्थ्यासाठी
उपयोग याबाबत माहिती देऊन लोह समृध्द आवळा-राजगिरा मिक्स टॉफीज यांचे सेवन
करण्याचे आवाहन केले
नांदखेडा येथील महिला अनिता
पेरके, पार्वतीबाई, त्रिवेणी वटाणे, अश्विनी आदने, दिपाली वल्लमवाड, अनिता देशमुख, शालुबाई पूरणवाड आणि सविता वाटाणे
यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधतांना दररोज आहार कसा असावा तसेच विविध आरोग्याच्या
समस्या आणि मानसिक स्वास्थ्याच्या समस्या याबरोबरच उद्योगव्यवसायाबाबत प्रश्न
विचारून समाधान करून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.
शंकर पुरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी रिलायन्स फाउंडेशन ग्रुपचे राज्य
समन्वयक दीपक केकान जिल्हा समन्वयक मनोज काळे, प्रोग्राम सपोर्टर रामजी राऊत,
माविम परभणीच्या जिल्हा समन्वयक नीता अंभोरे आणि प्रकल्पातील संशोधन सहाय्यक शीतल
मोरे, रुपाली पतंगे, मनीषा क–हाळे, धनश्री
चव्हाण आणि रामा शिंदे यांचे सहकार्य लाभले.