Friday, November 18, 2022

औरंगाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन

शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करणार ...... कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि

औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेले औरंगाबाद येथील कृषि तंत्र विद्यालय, कृषि विज्ञान केंद्र येथे दिनांक १७ नोव्‍हेंबर ते २० नोव्‍हेंबर दरम्‍यान आयोजित राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनेचे उदघाटन दिनांक १७ नोव्‍हेंबर झाले. कार्यक्रमाच्‍य अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर व्‍यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार मा श्री हरिभाऊ बागडे, आमदार मा श्री सतीश चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री विकास मीना, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, विभागीय कृषि सहसंचालक डॉ. डी.एल.जाधव, एसआयएएमचे अध्यक्ष श्री समीर मुळे, उद्योजक श्री रामचंद्र भोगले, कृषि तज्ञ श्री विजयअण्‍णा बोराडे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. टी. जाधव, डॉ. एस. बी. पवार, समन्वयक ॲड. वसंत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी कृषि विद्यापीठ प्रयत्नशील आहे. ड्रोन तंत्रज्ञानाबाबत युवकांना प्रशिक्षण देण्यात येत असून शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेती क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारे बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि प्रदर्शन महत्वाचे ठरणार आहे. शेती क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांचा सहभाग घेत शेतीचा विकास साधायचा आहे. कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान तसेच बाजारपेठेबाबत अद्ययावत माहिती देण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करणार आहे.  शेतकरी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व मिळून प्रयत्न करुया कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून लवकरच परभणी जिल्ह्यात ६०० युवकांना आधुनिक शेती तसेच ड्रोन तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांत हा उपक्रम राबविण्यात येईल. तसेच कुलगुरूंचा या पूर्वीचा आय सी ए आर नवी दिल्ली येथील असलेला अनुभवाचा औरंगाबाद येथे एक उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्वंकष उपकेंद्र स्थापन करण्याचा मानस त्‍यांनी व्यक्त केला.

आमदार मा श्री सतिष चव्हाण यांनी औरंगाबाद येथे विद्यापीठाचे उपकेंद्र विकसित करण्‍याबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन विद्यापीठाला मदत करण्याचे आवाहन केले.  तसेच विद्यापीठातील रिक्त जागा विचारात घेता या संबंधी उच्चस्तरीय बैठक घेऊन निर्णय घेण्याची विनंती केली. तर मा श्री हरिभाऊ बागडे म्हणाले की, शेतीत नविन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे. कृषि प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवतंत्राची माहिती मिळणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.

श्री राम भोगले यांनी कृषि प्रदर्शन आयोजित करण्‍यात खाजगी आणि सरकारी संस्थेने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. विशेषतः राज्याच्या ज्या भागात अश्या प्रकारचे अधिकाधिक कार्यक्रम होतात शेतकरी बांधवाना विविध आधुनिक तंत्रज्ञान अवलंब करण्‍यास प्रेरणा मिळते असे मत व्यक्त केले.

संचालक विस्तार शिक्षण डॉ देवराव देवसरकर म्हणाले की, अशा प्रकारच्या कृषि प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यन्त पोहचण्यास मदत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य समनव्यक महाऍग्रो चे श्री वसंतराव देशमुख यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ किरण जाधव यांनी मानले. प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर चर्चासत्र, पीक प्रात्येक्षिके, याच बरोबर विविध कंपनीचे दिडशे स्टॉल आणि शेती बाजाराची पन्नास स्टॉल लावण्यात आलेली असुन सदर प्रदर्शन दिनांक २० नोव्‍हेबर राहणार आहे.