Tuesday, November 29, 2022

हैद्राबाद येथील इक्रिसॅट आंतरराष्‍ट्रीय संस्‍थेच्‍या वतीने आयोजित तीन दिवशीय प्रशिक्षणात वनामकृवितील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्यांचा सहभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिविद्या विभाग, मृदा विज्ञान व रसायनशास्त्र विषयातील पदव्‍युत्‍तर आणि आचार्य पदवीच्‍या २५ विद्यार्थ्यांनी हैदराबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रिसॅट (आं‍त‍रराष्‍ट्रीय अर्ध-शुष्क उष्ण कटिबंध पीक संशोधन संस्‍था) यांच्‍या वतीने मातीतील कार्बन व्‍यवस्‍थापन यावर दिनांक २३ ते २५ नोव्‍हेंबर दरम्‍यान आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षणाअंतर्गत इक्रिसॅट संशोधकांनी विद्यार्थ्यांना जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे सुयोग्य नियोजन, मृदा अॅपचा वापर तसेच विविध पिकासाठी सिम्युलेशन मॉडेल तयार आदींचे प्रात्‍यक्षिकांव्‍दारे मार्गदर्शन केले. इक्रिसॅटच्‍या विविध विभागांना भेटी देण्यात आल्या व भविष्यात संलग्न स्वरुपात अनेक विभागातील संशोधन हे विद्यार्थ्याद्वारे नियोजित केल्या जाणार आहे. अशा प्रशिक्षणामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांना आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील ज्ञान अवगत करण्‍यास मदत होते, तसेच संशोधनास नवी दिशा प्राप्‍त होऊ शकते अशा प्रकारचे व्‍यासपीठ विद्यार्थ्‍यांना जास्‍तीत जास्‍त उपलब्‍ध करून देण्‍याकरिता कुलगुरू मा डॉ. इंद्र मणि हे सतत प्रयत्नशील असुन सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍याकरिता शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले व सहयोगी अधिष्‍ठाात डॉ. सय्यद ईस्माईल यांनी प्रयत्न केले. प्रशिक्षण यशस्वीतेकरिता डॉ. गोदावरी पवार, डॉ. एस. एल. वाईकर व डॉ. मेघा जगताप यांनीही प्रशिक्षणात सहभाग नोंदवीला.