वनामकृवित किटकनाशकांचा सुरक्षित न्याय वापर कार्यशाळा संपन्न
देश स्वातंत्र झाला त्यावेळी ५० दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन होते, आज देशात ३०० दशलक्ष टनापेक्षा जास्त अन्नधान्य उत्पादन होते, हे सर्व शेतकरी बांधव यांची कठोर मेहनत, कृषि तंत्रज्ञान आणि शासनाचे धोरण यामुळे साध्य करू शकलो. आज रासायनिक किटकनाशकाचा अयोग्य व अति वापरामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. शेतीत रासायनिक निविष्ठाचा शिफारशीप्रमाणे काटेकारपणे वापर आवश्यक असुन रासायनिक किटकनाशकांची फवारणी करतांना सुरक्षितताच्या दृष्टीने अनेक वेळा दुर्लक्ष होते. राज्यातील काही भागात किटकनाशकांचा दुष्परिणामामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शेतकरी बांधवांनी फवारणी करितांना सुरक्षतेच्या उपाय योजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात गुरूग्राम (हरियाणा) येथील किटकनाशक निर्मिती तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने दिनांक १९ नोव्हेंबर रोजी पीक उत्पादनात किटकनाशकांचा सुरक्षित न्याय वापर आणि नवीन किटकनाशक घटकांचा उपयोग यावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेचे संचालक डॉ. जितेंद्र कुमार आणि जिल्हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल या उपस्थित होत्या. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, मुख्य शास्त्रज्ञ डॉ एन ए शकील, निर्माण तज्ञ डॉ अमरीश अग्रवाल, शास्त्रज्ञ श्री सुदिप मिश्रा, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ पी एस नेहरकर, डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि पुढे म्हणाले की, येणारे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे, ड्रोन व्दारे किटकनाशकांची योग्य पध्दतीने फवारणी केल्यास कमी किटकनाशक मात्रेत प्रभावी किड व्यवस्थापन शक्य होणार आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातुन लवकरच कृषी विद्यापीठाव्दारे सहाशे युवकांना विविध कृषि तंत्रज्ञानात कौशल्य विकासाकरिता विशेष प्रशिक्षणाची सुरूवात करण्यात येणार आहे, याकरिता जिल्हाधिकारी श्रीमती आंजल गोयल यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे.
जिल्हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल म्हणाल्या की, कृषि विद्यापीठाने संशोधनाच्या आधारे विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकरी बांधवानी आत्मसाद करावे. आज हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे, पिक पध्दतीत बदल होत आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचा योग्य वापर करणे अत्यंत गरजेचे असुन अन्यथा पर्यावरणावर -हास होण्यास याच बाबी कारणीभुत ठरतील.
मार्गदर्शनात संचालक डॉ. जितेंद्र कुमार म्हणाले की, गुरूग्राम (हरियाणा) येथील किटकनाशक निर्मिती तंत्रज्ञान संस्थेच्या ही कीटकनाशके तयार करण्यासाठी आणि विश्लेषणात्मक संशोधन आणि विकासासाठी एक नामांकित संस्था आहे. पर्यावरण आणि वापरकर्त्यांना अनुकूल कीटकनाशके आणि त्यांचे अवशेष विकसित करते. अनेक वनस्पतीजन्य किटकनाशके योग्य वेळी वापरल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर मर्यादीत करणे शक्य होते, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ देवराव देवसरकर म्हणाले की, अनेक किटकनाशके ही बिषारी असतात, ते अत्यंक काळजीपुर्वक वापरावी लागतात, याचे ज्ञान शेतकरी बांधवा असणे आवश्यक आहे. सुत्रसंचालन डॉ सुनिता पवार यांनी केले तर आभार डॉ अमरीश अग्रवाल यांनी मानले.
तांत्रिक सत्रात नवीन किटकनाशक घटकांचा वापर यावर डॉ अमरीश अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले तर किटकनाशकांचा सुरक्षित न्यायिक वापर यावर श्री सुदिप मिश्रा, शेतीतील चांगल्या कृती यावर डॉ जी पी जगताप, किट व्यवस्थापनातील मुलभुत तत्वे यावर डॉ अनंत लाड, सेंद्रीय शेतीवर डॉ आनंद गोरे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित शेतकरी बांधवाना फवारणी सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मराठवाडयातील ३०० पेक्षा जास्त शेतकरी बांधव उपस्थित होते.