Wednesday, February 22, 2023

नाविण्यपुर्ण संशोधनाचा उपयोग करुन युवकांनी उद्योजक व्हावे .... कुलगुरु मा. डॉ. इन्‍द्र मणि

राष्ट्रीय कृषी विकास योजनाच्‍या माध्‍यमातुन रफ्तार ही योजना शासन राबवित आहे, या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना बळ देऊन, जोखीम कमी करणे आणि कृषी व्यवसाय उद्योजकतेला चालना देऊन शेतीला फायदेशीर उपक्रम बनवणे हा हेतु असुन कौशल्य विकास आणि आर्थिक सहाय्याद्वारे नवकल्पना आणि कृषी-उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी यात इनक्यूबेटीस केंद्र उभारणीस सहाय्य केले जाते. कृषि व्‍यवसायामध्‍ये नाविण्‍यपुर्ण संशोधनात्‍मक बाबींचा वापर होणे आवश्‍यक आहे, याकरिता कृषि शास्‍त्रज्ञांनी पुढे यावे. या योजनेकरिता मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था ही नोडल संस्था असुन या उपक्रमांचा शेतकरी, विद्यार्थी युवा शेतकरी यांनी लाभ घ्‍यावा, असे प्रतिपादन कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि अभाकृअप - केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ फेब्रुवारी रोजी शेतकरी, शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांचेकरिता “सिनर्जी ऑफ इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन” (नाविण्यपुर्ण व उष्मायन यातील समन्वय) यावरील तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, चर्चासत्राच्या अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

सदर चर्चासत्रात केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोककुमार भरीमल्ला, कृषि अभियंता डॉ. ज्योती ढाकणे आणि कृषि अभियंता डॉ. मनोज कुमार महावार यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजना मधील विविध योजनेबद्दल माहिती दिली. सदरील योजनेत नाविण्यपुर्ण संशोधनात्मक बाबींसाठी अनुदानाकरिता अर्ज सादर करण्‍याबाबत मार्गदर्शन केले. चर्चासत्रात नॅनो सल्फर (गंधक) या विषयावर शास्त्रज्ञांसाठी तांत्रिक सत्रात मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे आयोजक विभाग प्रमुख (कृषिविद्या) डॉ. वासुदेव नारखेडे व विभाग प्रमुख  (मृदाशास्त्र विभाग) डॉ. प्रविण वैद्य हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. सुनिता पवार यांनी मानले. चर्चासत्रास विद्यार्थी, शेतकरी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक मोठया संखेने उपस्थित होते.