Wednesday, February 1, 2023

अनुभवात्‍मक शिक्षणातुन कृषी उद्योजक घडले पाहिजेत ..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

मशरूम पासुन विद्यार्थ्‍यांनी बनविलेले चविष्‍ट खाद्य पदार्थ, माननीय कुलगुरूंनी केले कौतुक 

विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता कृषि अभ्यासक्रमाच्‍या अंतिम सत्रात अनुभवात्‍मक शिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येतो, यात शेतमाल उत्‍पादन, प्रक्रिया ते त्‍यांचे विपणन याचा प्रत्‍यक्ष अनुभव विद्यार्थ्‍यांना होतो. सदर उपक्रम अधिक प्रभावीपणे राब‍वुन यातुन कृषि उद्योजक घडले पाहिजेत. मशरूम हे एक पौष्टिक व आरोग्‍यदायी पदार्थ आहे, याबाबत समाजात जागृती करण्‍याची गरजेचे असुन याचे उत्‍पादन व पुरवठा सातत्‍य पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील वनस्‍पती रोगशास्‍त्र विभागाच्‍या अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांनी दिनांक ३१ जानेवारी रोजी चविष्‍ट मशरूम जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळकर, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, विभाग प्रमुख डॉ कल्‍याण आपेट आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, कृषि पुरक अनेक जोडधंदे आहेत, त्‍यात युवकांच्‍या कौशल्‍य विकासाकरिता विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. सन २०२३ हे वर्ष आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्ष म्‍हणुन आपण साजरे करित आहोत, परभणी विद्यापीठाने देशातील ज्‍वारीचा पहिला जैवसपृध्‍द वाण परभणी शक्‍ती विकसित केला असुन बाजरी मधील जैवसपृध्‍द वाण एएचबी-१२०० एफई आणि एएचबी-१२६९ एफई विकसित केले. यात लोह व जस्‍त प्रमाण अधिक असुन आरोग्‍यास हितकारक आहे, याबाबत जास्‍तीत जास्‍त जनजागृती करावी लागेल.

प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल म्‍हणाले की, मशरूम बाबत समाजात अनेक गैरसमज असुन यात प्रथिने, पचनशील फायबर, खनिजे असतात. तर प्रास्‍ताविकात डॉ कल्‍याण आपेट यांनी मशरूम पासुन विद्यार्थ्‍यांनी बनविलेले विविध पदार्थाबाबत माहिती दिली. कार्यक्रमात अनुभवात्‍मक शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांनी मशरूम पासुन बनविलेले चविष्‍ट पदार्थ, धपाटे, भजे, पिझ्झा, वडापाव, मशरूम बियार्णी, सैंडविच आदीं पदार्थाचे प्रदर्शन लावण्‍यात आले होते, या पदार्थाचे मान्‍यवरांनी चव चाखली. माननीय कुलगुरू यांनी विद्यार्थ्‍यांचे कौतुक केले. विद्यार्थ्‍यांनी आरोग्‍याकरिता मशरूम यावर नाटीका सादर केली. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संदीप बडगुजर, डॉ चंद्रशेखर आबडकर, डॉ मीनाक्षी पाटील डॉ विक्रम घोळवे, डॉ. महेश दडके आदीसह विभागातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.