Thursday, May 2, 2024

वनामकृविचा एमजीएम विद्यापीठासोबत सामंजस्य करार

विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी महत्वपूर्ण करार.... मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठ, यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी द्वारा माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी तर एमजीएम विद्यापीठ, यांच्यामार्फत माननीय कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या सामंजस्य करारानुसार दोन्ही विद्यापीठात सांघिकरीत्या, सहकार्यातून आणि सुसंवादातून अद्ययावत ज्ञान आणि विविध शैक्षणिक, संशोधनात्मक पद्धतींची देवाण-घेवाण साधण्यात येणार आहे. तसेच समान ध्येय-धोरणाद्वारे संवादाचे माध्यम स्थापित करून त्याद्वारे दोन्ही विद्यापीठाच्या विद्यार्थ्याना कौशल्य विकासाचे महत्वपूर्ण कार्य केले जाईल असे मत वनामकृविचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले. यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळण्यासाठी लाभ मिळणार आह. याशिवाय पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक सुधारणा नाविन्याची ओढ निर्माण करणे तसेच स्पर्धेमध्ये सहभागी होवून यश मिळविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबरोबरच भविष्यात नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार दोन्ही विद्यापीठाद्वारे शैक्षणिक आणि संशोधनात्मक संयुक्त प्रकल्प राबविण्यात येतील.        

यावेळी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, संचालक शिक्षण डॉ.उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, उपसंचालक डॉ. दिगंबर पेरके, तांत्रिक अधिकारी डॉ. सचिन मोरे, डॉ. प्रवीण कापसे आणि एमजीएम विद्यापीठाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.