Sunday, May 19, 2024

वनामकृवि अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले कामाचे निरीक्षण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या रस्त्यांची अवस्था मागील काही वर्षापासून अतिशय खराब होती. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाने २६ किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते मजबुतीकरणास आणि डांबरीकरणास मंजुरी दिली होती. या कामाचा शुभारंभ माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता. हे काम सध्या प्रगतीपथावर असून विहित मुदतीमध्ये पूर्ण करण्यात येवून विद्यापीठातील वाहतूक सुखकर होणार आहे. या कामाचा दर्जा अद्यावत मानकाप्रमाणे अतिशय उत्कृष्ट राहण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेस आणि बांधकाम कंत्राटदारास माननीय कुलगुरू हे सातत्याने निर्देश देत असतात. कामाच्या गुण नियंत्रणासाठी विद्यापीठ पातळीवर गुण नियंत्रण समिती गठीत केलेली आहे, त्यांच्याद्वारे कामाचे नियमित निरीक्षण केले जाते. याबरोबरच प्रत्यक्ष कामाच्यास्थळी जावून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि महाराष्ट्र राज्य रस्ते संशोधन संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक यांचे गुणनियंत्रण कार्यकारी अभियंता व त्यांचा चमू तसेच विद्यापीठ पातळीवर गठीत केलेल्या गुणनियंत्रण परीक्षण समिती यांनीही यापूर्वी  निरीक्षण केले होते व रस्त्याचे काम मानकाप्रमाणे आणि समाधानकारक होत असल्याची प्रतिक्रिया सर्व सदस्यांनी दिल्या होत्या. तसेच दिनांक १९ मे रोजी प्रत्यक्ष कामाच्यास्थळी जावून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि उप-विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांनी निरीक्षण केले आणि रस्त्याचे काम मानकाप्रमाणे आणि समाधानकारक होत असल्याची प्रतिक्रिया देवून योग्य दिशेने प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले.