Monday, May 20, 2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व वाव गो ग्रीन यांच्याद्वारे जांभ येथे संत्रा बागेवर ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक

शेतीतील विविध कामांपैकी फवारणी अत्यंत महत्त्वाचे काम असून त्याकरिता पारंपारिक पद्धतीचा वापर केल्याने शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेळेवर मजूर मिळत नाही, पिकास किडी किंवा रोग लागल्यावर वेळेच्या आत फवारणी होत नाही, मुजरावर व औषधीवर अवाढव्य खर्च करूनही पिकाच्या परिस्थितीनुसार बऱ्याच वेळेस सापाची भीती असते तसेच फळबाग व इतर पिकांची उंची इत्यादीबाबीमुळे प्रभावीपणे वेळेवर फवारणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे खर्च करूनही शेतीचे गणित बिघडते व उत्पादनात घट येते. शेतकऱ्यांच्या या अडचणी पाहता राष्ट्रीय पातळीवर ड्रोन करीता सल्ला देणारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांकरिता डॉ. शंकर गोयंका यांची गो ग्रीन कृषी विमान, हरियाणा या कंपनीशी शेतकऱ्यांना भाडेतत्वावर ड्रोन द्वारे फवारणी करता यावी याकरिता सामंजस्य करार केला. त्या अनुषंगाने आज जांब येथील श्री सुरेश रेंगे यांच्या संत्रा बागेत अडीच एकर वर फवारणी करून प्रात्यक्षिक देण्यात आले. विद्यापीठाच्या वतीने डॉ. स्मिता सोलंकी यांनी ड्रोन हाताळणी आणि उपयुक्तता यावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंत लाड, श्री अनिल हरकळ, डॉ.योगेश म्हात्रे तसेच वाव गो ग्रीन कंपनीचे श्री कोल्हे, श्री राहुल मगदूम आदींची उपस्थिती होती. ड्रोन पायलट आर्यवीर ठाकूर यांनी शेतकऱ्यांना ड्रोन प्रात्यक्षिक करून दाखवले. शेवटी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे शंका समाधान केले. परिसरातील ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी   अडीच एकर वरील संत्रा बागेत फवारणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सहभागी होवून उत्तम उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विद्यापीठांनी शेतकऱ्यांकरिता तंत्रज्ञान त्यांच्या बांधावर आणून अवगत केल्याने विद्यापीठाचे आभार मानले व उपस्थित शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसे व होणारे काबाडकष्ट हे कमी होऊन तरुण शेतकऱ्यांना नक्कीच या नवीन तंत्रज्ञानाद्वारे रोजगार उपलब्ध होईल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.