Tuesday, June 11, 2024

शेतकऱ्यांच्या कल्याणामधूनच देशाची प्रगती शक्य होईल - मा कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


देशाची प्रगती करावयाचीअसेल तर अगोदर शेतकऱ्यांची प्रगती करणे महत्त्वाचे आहे, शेतकऱ्यांच्या कल्याणामधूनच देशाची प्रगती शक्य होईल असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी म्हटले आहे. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या संकल्पनेतून आणि कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर जि. धाराशिव मार्फत आयोजित ऑइल सीड मॉडेल व्हिलेज अंतर्गत मौजे भुसणी ता. उमरगा येथे शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. सदरील शेतकरी मेळाव्यात मंचावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विभागीय कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. श्रीमंत हिरमुके, राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझरचे योगेश खाडे, सिंजेंटा प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापक श्री हरणे, मौजे भुसणीचे पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष आदींची उपस्थित होती.
मार्गदर्शनपर भाषणात मा कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, सन १९६० च्या अगोदर भारतात अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा होता. समुद्रातील जहाजातून अन्नधान्य आयात करावे लागत होते आणि भारतात वाटले जायचे. त्यामुळे त्या काळात उपासमारीचे प्रमाण देखील जास्त होते. परंतु सध्या परिस्थिती सुधारली आहे .आजमीतिला आपण वर्षाकाठी ३६० मे. टन अन्नधान्य पिकवतो तसेच ४०० मे. टन फळ व भाजीपाला पिकवत आहोत. सध्या भारताकडे अतिरिक्त अन्नधान्याचा साठा आहे परंतु त्यामध्ये कमतरता आहे ती फक्त तेलबिया व डाळवर्गीय धान्याची. सध्या आपण तेलबिया व डाळवर्गीय धान्य इतर देशांमधून आयात करतो. केंद्र शासनाने भारताला डिसेंबर २०१७ पर्यंत तेलबिया वर्गीय पिकांमध्ये स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अंतर्गत विविध योजनांमधून शेतकऱ्यांना तेलबिया व डाळवर्गीय धान्याचे पीक घेण्याकरिता प्रोत्साहन म्हणून बी-बियाणे व इतर निविष्ठाचे वाटप करण्यात येत आहे. राज्य व केंद्र शासनाने तेलबिया व डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन घेतलेले असून आता आपण आपले उत्पादन वाढवून हे आवाहन पेलणे महत्त्वाचे आहे. उत्पादन वाढीसोबत शेतकऱ्यांनी शेतीतील “जोखीम व्यवस्थापन” वर लक्ष देणे जरुरीचे आहे. हवामान बदलाची सूचना कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञाकडून अगोदरच घेऊन त्याप्रमाणे शेतीचे नियोजन करावे. तसेच शेतकऱ्यांनी सदर प्रकल्पात पीक लागवड खर्च तसेच उत्पादनाचा ताळेबंद काढून प्रति हेक्टरी नफा वाढवावा. सोबतच फक्त उत्पादनापर्यंत न थांबता विपणनाचे कौशल्य विकसित करून थेट ग्राहकापर्यंत पोहोचावे. शेवटी ते म्हणाले की माझी नेहमी भावना आहे की, शेतकरी देवो भव:
यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले म्हणाले की, अटारी पुणे मार्फत ऑइल सीड मॉडेल व्हिलेज हा प्रकल्प जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांच्या २०० हेक्टर क्षेत्रावर राबविल्या जाणार आहे. सदरील प्रकल्पातील शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा (बीबीएफ) पद्धतीचा वापर करावा. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञाने सांगितलेल्या लागवडीच्या सूत्रांचा आपल्या पीक व्यवस्थापनात अंतर्भाव करावा. तसेच शेतकऱ्यांनी सूर्यफुलाच्या पिकाकडे वळणे आजच्या घडीला महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन + तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून आपले उत्पन्न वाढवावे जेणेकरून एखादे पीक न आल्यास दुसऱ्या पिकाचा आधार मिळेल किंवा दोन्ही पीक चांगल्या प्रकारे आल्यास एका पिकाचे उत्पन्न बोनस म्हणून वापरता येईल. शेवटी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की प्रगतशील शेतकऱ्यांचा इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा हेच त्यांच्या यथोचित सन्मानाचा उद्देश आहे.
तदनंतर डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी भारतात आजमीतिला ४४ लाख टन डाळीची आवश्यकता असताना आपण २९ लाख टन दाळ उत्पादित करत असून अशाप्रकारे १५ लाख टन डाळीचा तुटवडा आहे. याकरिता तूर पिकांवरील सखोल मार्गदर्शनात ते म्हणाले की, मागील वर्षी ५०% पेक्षा जास्त मर आलेल्या शेतात तुरीची लागवड यावर्षी करण्यात येऊ नये. मर लागलेल्या शेतातील तुरीचा बियाणे म्हणून वापर करू नये. कोरडवाहू करिता बीडीएन-७११ तसेच ज्यांच्याकडे एक किंवा दोन पाणी देण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी गोदावरी, बीएसएमआर-७३६ आदी बियाणांचा वापर करावा. जिथे वांजपणा येतो अशा ठिकाणी घरच्या बियाण्यांचा वापर करू नये. पेरणीपूर्वी एकरी पाच लिटर किंवा पाच किलोग्राम बायोमिक्स अथवा ट्रायकोडर्माचा वापर करावा. तसेच शेतकऱ्यांनी बियाणे प्रक्रिया करूनच पेरणी करावी. पेरणीनंतर जुलै महिन्यात बायोमिक्सची आळवणी करावी तसेच सप्टेंबर महिन्यात वापसा आल्यावर ताबडतोब रिडोमिल या बुरशीनाशकाची १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम प्रमाणे फवारणी घ्यावी. सदरील शेतकरी मेळाव्याची प्रस्तावना कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती अपेक्षा कसबे यांनी आणि आभार श्री महेश हिरमुके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विजयकुमार जाधव, श्री शिवराज रुपनर, श्री राठोड यांनी परिश्रम घेतले. या शेतकरी मेळाव्या करिता ४०० महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.