Wednesday, June 5, 2024

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

 पर्यावरण स्नेही होऊन भूमीचे रक्षण करणे आवश्यक  – डॉ.जया बंगाळे 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यनिमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आजच्या आधूनिक काळात पर्यावरणाचा ऱ्हास होत असून प्रचंड वृक्ष तोड, दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यातूनच निसर्गातील ऋतू चक्र बदलत असून जागतिक तापमानवाढी सारख्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे संपूर्ण जीव सृष्टीला धोका निर्माण झाला असून एकूणच सजीवांची परिसंस्था धोक्यात आली आहे. म्हणूनच प्रत्येकाने पर्यावरण पूरक जीवनशैली विकसित करून पुढील पिढीसाठी पर्यावरणाची जपणूक करणे आवश्यक आहे असे मनोगत डॉ.जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केले. या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे घोष वाक्य ‘आमची जमीन-आमचे भविष्य’ असे असल्याने सर्वांनी पर्यावरण स्नेही होऊन आपल्या भूमातेचे रक्षण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विद्यानंद मनवर, कार्यक्रम अधिकारी, रासेयो यांनी केले. या वेळी डॉ. सुनिता काळे, डॉ.नीता गायकवाड, डॉ.वीणा भालेराव, डॉ.शंकर पुरी, डॉ.अश्विनी बिडवे, डॉ.कल्पना लहाडे, प्रा.ज्योती मुंडे, प्रा. प्रियांका स्वामी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रमेश शिंदे, प्रसाद देशमुख, राम शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.