वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्ष विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे या होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये झालेले सकारात्मक बदलाचे वर्णन करत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याबरोबरच विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी अंगिकारावयाच्या महत्वाच्या बाबींची जाणिव करून दिली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाची ज्योत महाविद्यालयातून प्रज्वलित करून घेऊन, ही ज्ञानाची ज्योत समाजोपयोगी कार्यासाठी आणि स्वतःचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी सतत तेवत ठेवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जिमखाना उपाध्यक्षा डॉ. सुनिता काळे, यांनी विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण चार वर्षांमध्ये आलेले विविध अनुभव सांगून विद्यार्थांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तदनंतर निरोप देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाल्य प्राध्यापक डॉ. नीता गायकवाड या मागील चार वर्षात विद्यार्थ्यासमवेत आलेल्या आठवणीना उजाळा देताना भावूक झाल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आलेल्या समस्या सोडवताना त्यांना आलेले अनुभव सांगून ते करत असताना मनाला समाधान लाभले असे त्यांनी नमूद केले. तर सामुदायिक विस्तार व संदेशवहन व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी, यांनी ही विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाचे कौतुक केले आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थीनी रश्मी पांडे आणि रुणाली धबाले तसेच पदवीपूर्व अंतिम वर्षातील विद्यार्थी सावित्रा तायनात, सेजल गुंडेवार, मयूर मांडूळकर, यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शिक्षक वृंदासह महाविद्यालयाप्रती ऋण व्यक्त केले. याबरोबरच विद्यार्थ्यांनी त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक क्षेत्रात येश संपादन करून आनंदी जीवन व्यतीत करण्यासाठी सदरील अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे नमूद केले.
कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुनिता काळे यांनी आयोजित केला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ. वीणा भालेराव, डॉ. विद्यानंद मनवर, यांच्यासह या महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत.