Wednesday, June 19, 2024

पूर्व प्राथमिक शाळांच्या नवीन शैक्षणिक धोरणाबाबत पालकांनी सजग होणे आवश्यक - डॉ. जया बंगाळे


 

बाल विकासाच्या दृष्टीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाला प्रथमच मुख्य शैक्षणिक प्रवाहात जोडले गेल्याने यास अधिक महत्त्व प्राप्त झाले असून याबाबत पालकांनी सजग होणे आवश्यक असल्याचे मत प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाअंतर्गत असलेल्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतर्फे आयोजित पालक कार्यशाळेत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपरोक्त विचार मांडले. बालकांसाठी घर हीच त्यांची प्रथम शाळा असल्याने, त्यांची पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान विकसित होण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असून त्याकरिता घ्यावयाच्या विविध कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. बालकांच्या सृजनतेस प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये सहानुभूती, आदर, स्वच्छता, सेवाभाव, सार्वजनिक मालमत्तेची काळजी, जबाबदारी पेलण्याची क्षमता, नैतिक मूल्य याबरोबरच जीवन कौशल्ये आदी बाबी विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. तद़पश्चात विभागातील डॉ. नीता गायकवाड यांनी पूर्व प्राथमिक शाळेत येण्यापूर्वी बालकांच्या मानसिकतेची तयारी कोणत्या पद्धतीने करावी जेणेकरून बालक सहजपणे शालेय वातावरणात समायोजित होईल याविषयी पालकांना मार्गदर्शन केले. डॉ. वीणा भालेराव यांनी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेची वैशिष्ट्ये आणि नियमावली याविषयी पालकांना  जागरूक  केले. या कार्यशाळेसाठी प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यासाठी उपयुक्त व आनंददायी वातावरण निर्मिती करण्यासाठी कटीबदध राहण्याच्या हेतूने नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार उपस्थित शिक्षक व पालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणासंबंधीची  "निपुण प्रतिज्ञा" घेण्यास प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन शिक्षिका श्रुती औढेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा. प्रियंका स्वामी, सर्व शिक्षिका मदतनीस कार्यालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले सदरील कार्यशाळेसाठी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.