Wednesday, July 18, 2018

मराठवाडयात महिलांच्‍या सहभागाने रेशीम क्रांती शक्‍य.......कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण

वनामकृवित रेशीम उदयोगावर एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण संपन्‍न
कुटुबांतील किंवा शेतीतील कोणतेही काम ग्रामीण भागातील महिला या काटेकोरपणे व शास्‍त्रशुध्‍द पध्‍दतीने करतात, म्‍हणून महिलांनी जर पुरुषांच्‍या बरोबरीने रेशीम शेतीत सहभाग घेतला तर निश्‍चीतच मराठवाडयात रेशीम क्रांती होवू शकते, असे प्रतिपादन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र येथे रेशीम संशोधन योजना व परभणी आत्‍मा यांचे संयुक्‍त विदयमाने ‘‘शेतीवर आधारीत तुती रेशीम उदयोग’’ या विषयावर दिनांक १७ जुलै रोजी आयोजित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, परभणी आत्‍माचे प्रकल्‍प संचालक श्री. के. आर. सराफ, रेशीम संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सी.बी. लटपटे, विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, केंद्रीय रेशीम बोर्डाचे श्री. करंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  
कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले कि, अल्‍प व अत्‍यल्‍प भुधारणा, कोरडवाहू शेती, निसर्गाचा असमतोल, शेतमालाचे बाजारभाव आदी मराठवाडयातील शेतक-यांचे अनेक प्रश्‍न आहेत. गाव पातळीवर शेतमाल प्रक्रिया उदयोगाचा विकास करणे गरजेचे आहे. शेती किफायतशीर करण्‍याच्‍या दृष्‍टीने शेती पुरक उद्योगाची जोड द्यावी लागेल. रेशीम उदयोगातील तांत्रिक बाबी समजून घेतल्‍या तर निश्‍चीतच शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट होईल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी तरुण शेतक-यांना रेशीम शेतीची कासधरा व आपली उन्‍नती करा असे आवाहन करूण म्‍हणाले की, मराठवाडा तुती लागवडीचे प्रमाण वाढत असुन मराठवाडा रेशीम शेतीचे हब होऊ शकते. कोष उत्‍पादनाबरोबर धागा निर्मीती व कापड निर्मीतीची सोय निर्माण झाली तर मराठवाडयाची पैठणी पुन्‍हा नावारुपाला येईल. शेतक-यांनी गटाच्‍या माध्‍यमातून रेशीम धागा व कापड निर्मीती करावी, जेणेकरुन बाजारभावातील चढ-उतार यावर मात करता येईल.
प्रशिक्षणात डॉ. सी. बी. लटपटे यांनी तुती लागवडीमधील बारकावे तंत्रशुध्‍द पध्‍दतीने समजून सांगितले तर आत्‍मा प्रकल्‍प संचालक श्री. के. आर. सराफ यांनी शेंदरी बोंड अळीचे संकट कमी करण्‍यासाठी शेतक-यांनी रेशीम शेतीकडे वळण्‍याचे आवाहन करून परभणी जिल्‍हाधिकारी यांचे मान्‍यतेने प्रशिक्षणासाठी निधी उपलब्‍ध करुन दिल्‍याचे नमुद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. जे. एन. चौंडेकर यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, July 16, 2018

विद्यापीठातील दर्जेदार बहुवार्षिक चारापिकांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा....कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण

खरेदीसाठी शेतक-यांचा मोठा प्रतिसाद 
मराठवाड्यातील पशुपालकांची मोठया प्रमाणात असलेल्‍या गरज लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील संकरीत गो पैदास प्रकल्प प्रक्षेत्रावर पंधरा एकर क्षेत्रावर सुधारीत चारापिकांची लागवड करण्यात आलेली आहेकुलगुरु माडॉअशोक ढवण यांच्या हस्ते दि१६ जुलै रोजी चारापिकांच्या ठोबांचा पुरवठ्यास प्रारंभ करण्यात आलायावेळी संशोधन संचालक डॉदत्तप्रसाद वासकरविस्तार अधिकारी (पशुसंवर्धनडॉकनलेवरिष्‍ठ शास्त्रज्ञ डॉदिनेशसिंह चौहानडॉअशोक जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होतीवैरण विकास कार्यक्रमांतर्गत दोन लक्ष ठोंबाचा परभणी जिल्हा परिषदेच्‍या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयास पुरवठा करण्यात आला असुन सन २०१८-१९ मध्ये एकुण २५ लक्ष ठोंबाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे
यावेळी कुलगुरु माडॉअशोक ढवण म्हणाले कीमराठवाडयात दुग्धव्यवसायास मोठा वाव असुन चारापिकांची कमतरता ही पशुपालकांसमोर मुख्य समस्या आहेदुग्धोत्पादनास चालना देण्‍यासाठी विद्यापीठ प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या दर्जेदार सुधारित चारापिकांच्‍या ठोंबाची पशुपालकांनी लागवडीसाठी उपयोग करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले
याप्रसंगी संचालक संशोधन डॉदत्तप्रसाद वासकर म्हणाले कीविद्यापीठ प्रक्षेत्रावर सतरा बहुवार्षिक व दहा हंगामी चारापिकांची ठोंबे नाममात्र दरात विक्रीसाठी उपलब्ध असुन सद्यस्थिती व हवामानचारापिकांच्या लागवडीस अत्‍यंत उपयुक्‍त आहे
सद्यस्थितीत संकरीत गो पैदास प्रकल्‍प येथील पंधरा एकर क्षेत्रावर बहुवार्षिक संकरीत नेपीयर गवताच्या जयवंत, गुणवंत, संपदा (डीएचएन-), बीएनएच-१०, आयजीएफआरआय-, सीओबीएन-५ इत्यादी चारापिकांच्‍या जाती उपलब्ध असुन पॅराग्रास, दशरथ, बहुवार्षिक ज्वार ही चारापिके विक्रीस उपलब्ध आहेत.

Friday, July 13, 2018

हुमणी किड व्यवस्थापनाकरिता वनामकृविच्‍या किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

सध्या मराठवाडयामधील सर्व जिल्हयात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी मणीचे सुप्त अवस्थेतील भुंगे जमिनीतुन बाहेर पडत आहेत. हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात. प्रौढ अवस्था ही बाभुळ, कडुलिंब, बोर आदी झाडावर उपजिविका करतात. तर अळी अवस्था पिकांच्या मुळा कुडतूडुन नुकसान करते. प्रौढ भुंगेरे जमिनीतुन निघाल्यानंतर ते बाभुळ, कडुलिंब, बोर आदी झाडावर राहतात व त्यांचे मिलन होऊन जमिनीत अंडी देतात. अंडयातून निघालेल्या अळया पिकाना नुकसान पोहचवितात. त्यामुळे सध्या जमिनीतुन निघालेल्या हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन अंडी घालण्या अगोदरच झाल्यामुळे अंळी पासून पिकांना होणारे नुकसान टाळता येते, त्‍या करिता पुढील उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे.  
प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन
-    झाडाच्या फांदया हालवून खाली पडलेल्या भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा. चांगला पाऊस पडताच सुर्यास्तानंतर सुप्तावस्थेतील प्रौ भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुलिंब इत्यादी झाडावर पाने खाण्यासाठी मिलनासाठी जमा होतात. झाडावर जमा झालेली भुंगेरे रात्री 8 ते 9 वाजता बांबुच्या काठीच्या साहाय्याने झाडाच्या फांदया हालवून खाली पाडावेत आणि ते हाताने गोळा करुन रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे. तसेच जो पर्यंत जमिनीतून भुंगेरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे.
-    प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करुन देखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात. हे प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर, झोपडी, विहीरीजवळ किंवा झाडावर लावावेत. सापळया जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे साधारपणे संध्याकाळी 7.30 ते 8.30 या कालावधीत लावावेत.
-    किटकनाशकांची फवारणी केलेल्या बाभूळ, कडुनिंब यांच्या फांदया शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावी. रात्रीला भुंगेरे फांदयावरील पाने खाल्यामुळे रुन जातील.
-    जमिनीतून प्रौढ भुंगेरे निघण्याच्या कालावधीत बाभूळ, कडुनिंब इत्यादी झाडावर सरासरी 20 अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास किंवा झाडांची पाने खाल्लेली आढळल्यास कोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मि.ली. प्रती दहा लिटर पाण्‍यात मिसळून झाडावर फवारणी करावी. फवारणीनंतर 15 दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ देऊ नयेत.
अळीचे व्यवस्थापन
-    ज्या क्षेत्रामध्ये मागील 2 वर्षापासून हुमणीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे, अशा क्षेत्रात पेरणी करतांना जमिनीतुन जैविक परोपजिवी बुरशी मेटारायझियम ॲनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा प्रति हेक्टर 10 किलो या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. किंवा फोरेट 10 टक्के दाणेदार किंवा फिप्रोनिल 0.3 टक्के दाणेदार 25 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात दयावे

वरिल प्रमाणे शेतकऱ्यांनी हुमणीच्या प्रौढ भुंगेरे व अळयांचे सामूहीकरित्या व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन कृषि किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व क्रॉपसॅप प्रकल्पाचे डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. अनंत बडगुजरडॉ. कृष्णा अंभुरे यांनी केले आहे.

Wednesday, July 11, 2018

वनामकृवितील परभणी येथील प्रक्षेत्रावर बहुवार्षीक चारापिकाचे बेणे विक्रीस उपलब्‍ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील संकरित गो पैदास प्रकल्‍पाच्‍या प्रक्षेत्रावर 15 एकर चारापीक प्रक्षेत्र विकसित करण्‍यात आलेले आहे. या प्रक्षेत्रावर बहुवार्षीक संकरित नेपीअर गवत, जयवंत, गुणवंत, डीएचएन-6, बीएनएच-10, सीओबीएन-5 व आयजीएफआरआय-7 तसेच पॅराग्रॉस, दशरथ, बहुवार्षी ज्‍वारी, सीओएफएस-327, ल्‍युसर्न आदी चारापिके मोठया प्रमाणात लागवड करण्‍यात आलेली आहे. सद्यस्थितीत बहुवार्षीक संकरित नेपीअर, पॅराग्रॉस, दशरथ आदी चारापिकांचे बेणे विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत. सदरिल प्रक्षेत्राचा विकास संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आला आहे. विक्रीसाठी डॉ दिनें‍शसिंग चौव्‍हाण मोबाईल क्रमांक 942317175 किंवा श्री दुधाटे 7588082119 यांच्‍याशी सपर्क साधवा.

Tuesday, July 10, 2018

मौजे जांब येथे साधारणत: 200 जनावरांचे लसीकरण शिबीर

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांर्गत असलेल्‍या परभणी कृषि महाविद्यालच्‍या करडई संशोधन केंद्र येथे कार्यरत असलेल्‍या कृषीकन्‍याच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम व राष्ट्रीय सेवा योजना यांच्‍या माध्यमातुन मौजे. जांब ता. जि. परभणी येथे दिनांक 10 जुलै रोजी जनावरांचे लसीकरण शिबीर घेण्‍यात आले. यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, डॉ. एस. बी. बैनवाड, पशुवैद्यडॉ. उमेश लकारे, डॉ. विजयकुमार हतागळे, श्री वायद अन्सारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी घटसर्प व फ-या या रोगावरील लस गावातील साधारणत: 200 जनावरांना देण्यात आली. यावेळी शेतक-यांना डॉ. एस. बी. बैनवाड यांनी लसीकरणाचे महत्व पटवुन सांगितले तर पशुवैद्यक डॉ. उमेश लकारे यांनी जनावरांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गावांतील शेतकऱ्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. पपीता गौरखेडे कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वाती झाडे यांच्‍या मार्गदर्शनानुसार कृषीकन्‍यांनी परिश्रम घेतले.