Monday, April 22, 2024

वनामकृविचा अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील आचार्य नरेंद्र देव कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठासोबत सामंजस्य करार

कृषि, वन, पशुपालन आणि हवामान शास्त्र या विषयांमध्ये संयुक्त कार्य करण्यावर भर.... कुलगुरू डॉ. इन्द्र मणि 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि आचार्य नरेंद्र देव कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कुमारगंज, अयोध्या, उत्तर प्रदेश यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी द्वारा माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी तर आचार्य नरेंद्र देव कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कुमारगंज, अयोध्या, उत्तर प्रदेश यांच्यामार्फत माननीय कुलगुरू डॉ. बिजेंद्र सिंह यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
दोन्ही विद्यापीठांमधील सामंजस्य करारानुसार कृषि, वन, पशुपालन आणि हवामान शास्त्र या क्षेत्रामध्ये संयुक्तपद्धतीने कार्य करण्यासाठी सहमती दर्शवली असून या कार्याच्या अंमलबजावणीचे धोरणावरही सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात आले.  या सामंजस्य करारानुसार होणाऱ्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्याचा लाभ दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थ्यांसहित विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना होईल, याबरोबरच नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले व्यावसायिक शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण मिळण्याची संधी प्राप्त होवून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये विकास होणार आहे.
सदरील करार वनामकृविसोबत करण्यासाठी आचार्य नरेंद्र देव कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने पुढाकार घेतला आणि माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या आचार्य नरेंद्र देव कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भेटीदरम्यान करण्यात आला. यावेळी त्या विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. ए के गंगवार, उपसंचालक संशोधन डॉ. शंभूप्रसाद, कुलसचिव डॉ. पी एस प्रामाणिक, विविध शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रतिमा सिंह, डॉ. संजय पाठक, डॉ. सी पी सिंह, हवामान शास्त्रज्ञ डॉ. सीताराम मिश्रा आणि कुलगुरू यांचे स्वीय सचिव डॉ. जसवंत सिंह यांची उपस्थिती होती.