Monday, April 8, 2024

प्रगतशील शेतकरी डॉ. धनराज केंद्रे यांच्‍या फळबागेस कुलगुरू मा डॉ. इंद्र मणि यांची भेट


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठ शास्‍त्रज्ञासह दिनांक ७ एप्रिल रोजी मौजे राजेवाडी येथे माजी उपायुक्‍त डॉ. धनराज केंद्रे यांच्‍या खरबुज आणि मोसंबी बागेस भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले की, पिक लागवड मध्‍ये मजुरांचा मोठा प्रश्‍न असुन वाढता मजुरी खर्च आणि मजुरांची घटती कार्यक्षमता पाहता, शेतीत यांत्रिकीकरण करणे गरजेचे आहे. डॉ धनराज केंद्रे यांच्‍या शंभर एकर शेतीचे व्‍यवस्‍थापन हे संपुर्णपणे कुटुबांतील सदस्‍य करतात. त्‍यामुळे मजुरांवरील खर्च कमी होतो तसेच शेतातील कामे कार्यक्षमरित्‍या वेळेत होतात. मराठवाडयात अनेक प्रगतशील शेतकरी चांगली शेती करतात, त्‍यांचे शेती कसण्‍याचे तंत्रावर विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी संशोधन करावे, त्‍यांच्‍या शेतीचे सामाजिक - आर्थिक विश्‍लेषण झाले पाहिजे. प्रगतशील शेतकरी हे इतर शेतकरी बांधवाकरिता दिशादर्शक कार्य करतात. भेटी प्रसंगी त्‍यांनी डॉ केंद्रे यांच्‍या  कुंटुबातील सदस्‍यासोबत संवाद साधला. 

याप्रसंगी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ प्राचार्य डॉ. व्ही.एस. खंडारे, डॉ. संतोष बारकुले, डॉ. प्रविण कापसे, डॉ. बी.एस. कलालबंडी, डॉ. धीरज पाथ्रीकर आदीसह पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्यी उपस्थित होते. डॉ धनराज केंद्रे हे परभणी कृषी विद्यापीठातुन आचार्य पदवीधारक आहेत, यांचे शंभर सदस्‍यांचे मोठे संयुक्‍त कुंटुब असुन कुंटुबातील सदस्‍यच शेतीची कामे करतात. शंभर एकर मध्‍ये त्‍यांनी सोयाबीन, कापुस पिकासह खरबुज व मोंसबी बागेचे योग्‍य असे व्‍यवस्‍थापन केले असुन यावर्षी यातुन चांगले उत्‍पादन काढले आहे.