Thursday, April 4, 2024

वनामाकृविचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांची कृषि महाविद्यालय लातूर येथे भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय लातूर येथे वनामाकृवि माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी दिनांक ३ मार्च रोजी भेट दिली. त्यांच्या सोबत कृषि महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. एम. ठोंबरे आणि पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चाकूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. व्ही. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी प्रामुख्याने प्रियदर्शनी, पदवी आणि पदव्युत्तर या तीन मुलींच्या वसतिगृहास भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनीनी सोबत सवांद साधला आणि त्यांचा आहाराची व निवासाची चौकशी केली असता विद्यार्थिनी सकाळी नाश्ता करत नसल्याचे लक्षात आले. यावरून कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी विद्यार्थीनीना सकाळच्या नाश्त्याचे महत्व पटवून दिले आणि विद्यार्थीनीना सकाळी वसतिगृहामध्ये नाश्ता उपलब्ध करून द्यावा आणि विद्यार्थीनीनी नियमित नाश्ता घेण्याची आग्रही भूमिका घेवून महाविद्यालयास तसे निर्देश दिले. त्यांनी वसतिगृहाच्या स्वच्छतेबाबत आणि वृक्षलागवडीबाबत समाधान व्यक्त केले. तदनंतर विद्यार्थ्यांच्या कार्यानुभवातून शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यान्वित असलेला रेशीम प्रकल्पास भेट दिली याठिकाणी विद्यार्थ्यांनी रेशीम कोषापासून तयार केलेल्या विविध वस्तू, हार यांची पहाणी केली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयामध्ये अर्चर्ड मिडलँड डॅनियल या अमेरिकन कंपनीद्वारा प्राप्त रु. २० लाख सीएसआर निधीतून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सोयाबीन मध्ये रासायनिक शेतीपासून टप्प्या टप्प्याने एकात्मिक शेतीकडे वाटचाल या प्रकल्पास भेट दिली. शेवटी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सोबत विविध उपक्रमावर चर्चा केली आणि निर्देश दिले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. विजय भामरे, डॉ.दयानंद मोरे आणि डॉ. व्यंकट जगताप यांची उपस्थिती होती.