Friday, April 12, 2024

वनामकृवित सलग अठरा तास अभ्यास उपक्रम संपन्न

 सलग कार्य करून यश प्राप्ती मिळते.....कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शातील महत्वाचा गुण म्हणजे सलग अभ्यास, हा गुण विद्यार्थ्यामध्ये वृधिंगत होणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने    जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी हाती घेतलेले कोणतेही कार्य सलग करावे असे प्रतिपादन वनामकृविचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने कृषि महाविद्यालय परभणीच्या वतीने विद्यापीठ ग्रंथालयात सलग अठरा तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी ६.०० ते रात्री १२.०० दरम्यान करण्यात आले. या उपक्रमाच्या उदघाटन समारंभात ते अभासी माध्यमाद्वारे बोलत होते. यावेळी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विविध विभागाचे विभाग प्रमुख आदींची उपस्थिती होती. संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, विद्यापीठाने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती नुकतीच साजरी केली आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यापीठ विविध उपक्रम राबवत आहे. या दोन्हीही महापुरुषांनी शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी उच्च विद्याविभूषित व्हावे आणि जीवनमुल्यांची जपणूक करून अंगी उत्तम गुण निर्माण करावेत असे आवाहन केले.

यावेळी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा समाजकल्याणासाठी करावा असे नमूद केले. सदरील कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर,  उपाध्यक्ष्य जिमखाना डॉ. पुरुषोत्तम झवंर  आणि विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. संतोष कदम  यांनी पार पाडला. कार्याक्रमामध्ये वंदना आणि सूत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले तर आभार डॉ. संतोष कदम यांनी केले. या उपक्रमात विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे ५१० विद्यार्थी व विद्यार्थीनीनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.