Friday, April 5, 2024

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्यापीठ कटिबद्ध

 कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षाकेंद्रास माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांची भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये  दोन वर्षाच्या कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी ६ घटक आणि ५१ खाजगी कृषि तंत्र विद्यालयाचा विस्तार आहे. हा अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना शासकीय सेवेत तसेच खाजगी क्षेत्रामध्ये चांगली संधी उपलब्ध असते. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी सर्व घटक आणि खाजगी कृषि तंत्र विद्यालयाच्या व्दितीय वर्षाची वार्षिक परीक्षा केंद्रीय पद्धतीने मराठवाड्यामध्ये ६ घटक कृषि तंत्र विद्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येत आहे. यानिमित्त परभणी येथील परीक्षा केंद्रास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) कृषि तंत्र शिक्षण शाखा डॉ. गजेंद्र लोंढे, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, प्राचार्य डॉ. एस. आर. पिल्लेवाड आणि परीक्षा प्रमुख श्री.अशोक खिल्लारे यांची उपस्थिती होती.

यावेळी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी संपूर्ण परीक्षा पद्धतीचे सखोल निरीक्षण केले. कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाची गुणवत्ता वाढीसाठी केंद्रीय परीक्षेचे अनन्य साधारण असे महत्व असल्याचे मत व्यक्त करून अभ्यासक्रमाची गुणवत्ता वाढीसाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामधून एकूण २७५० विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत. यापैकी घटक कृषि तंत्र विद्यालय, परभणी अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील १ घटक आणि ९ खाजगी विद्यालयातील एकूण ५१० विद्यार्थ्यांची परीक्षा कृषि महाविद्यालय, परभणी येथे घेण्यात येत आहे.