Monday, February 10, 2020

कृषि यांत्रिकीकरणाकरिता शेतकरी, कृषि अभियंता व कृषि अवजार निर्माते यांच्‍यातील समन्‍वय महत्‍वाचा ........ कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित कृषि यांत्रिकीकरण दिन साजरा

शेतकामाकरिता शेत मजुरांची कमतरता, वाढती मजुरी यामुळे कृषि यांत्रिकीकरणाची गरज असुन शेतक-यांच्‍या गरजेनुसार मनुष्‍य चलित, बैल चलित व ट्रॅक्टर चलित यंत्राचा वापर वाढवावा लागेल. अल्‍प, मध्‍यम व मोठे भुधारक शेतक-यांची कृषि यंत्राची गरज वेगवेगळी असुन कृषि  यांत्रिकीकरण वाढीसाठी कृषि अभियांत्रिकी संशोधन व निर्मितीत शेतकरी, कृषि अभियंता व कृषि अवजार निर्माते यांच्‍यातील समन्‍वय अत्‍यंत महत्‍वाचा आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयक संशोधन प्रकल्‍प पशुशक्‍तीचा योग्‍य वापर यांच्‍या वतीने कृषि यांत्रिकीकरण दिवसानिमित्‍त सुधारित कृषि अवजारे व अपारंपारिक ऊर्जा साधनांचे प्रदर्शन व प्रात्‍याक्षिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 10 फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, प्रगतशील शेतकरी श्री चंद्रकातदादा वरपुडकर, प्राचार्य डॉ उद्य खोडके, आयोजक संशोधन अभियंता डॉ स्मिता सोलंकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, कृषि संशोधनात प्रयोग‍शील शेतक-यांचे योगदान राहिल्‍यास निश्चितच शाश्‍वत कृषि तंत्रज्ञान विकसित होऊ शकते. कृषि यांत्रिकीकरणात विद्यापीठाच्‍या कृषि अभियंताचे भरिव असे योगदान दिले आहे. जास्‍त किंमतीचे कृषि अवजारे  वैयक्तिकरित्‍या शेतकरी खरेदी करू शकत नाहित यासाठी गटशेती किंवा शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याच्‍या माध्‍यमातुन एकत्र येण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.  
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी कृषि अभियांत्रिकी विभागाच्‍या वतीने मनुष्‍याचे शेतीतील श्रम व खर्च कमी करण्‍याच्‍या उद्देशाने आजपर्यंत 18 कृषि अवजारांचे प्रसारण केले असुन ही सर्व अवजारे शेतक-यांच्‍या शेतात उपयोगात आहेत. ही यंत्रे जास्‍तीत जास्‍त शेतक-यांना उपलब्‍ध व्‍हावी यासाठी खाजगी कृषी अवजारे निर्मित्‍याच्‍या माध्‍यमातुन कृषि विद्यापीठ प्रयत्‍नशील असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
प्रगतशील शेतकरी श्री चंद्रकातदादा वरपुडकर म्हणाले की, पिक उत्‍पादन वाढीच्‍या दृष्‍टीने पेरणी योग्‍य पध्‍दतीने होणे गरजेच असुन पेरणी यंत्राव्‍दारे पेरणी करतांना पिकांच्‍या वाणाच्‍या वाढ गुणधर्माचे ज्ञान शेतक-यांना असणे आवश्‍यक असल्‍याचे सांगुन सुधारित कृषि अवजारांचा वापर करतांना शेतक-यांनी कृषि विद्यापीठाच्‍या कृषि अभियंताशी सातत्‍यांने संवाद साधण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.
कार्यक्रमात कुलसचिव श्री रणजित पाटील, प्रगतशील शेतकरी नामदेव लाखाडे, गोविंद देशमुख, नरेश शिंदे, तुकाराम दहे, पंडित थोरात आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. यावेळी आयोजित सुधारित कृषि अवजारांचा व यंत्राचा समावेश असलेल्‍या कृषि प्रदर्शनीचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले तसेच सुधारित कृषि अवजारांची माहिती असलेल्‍या योजनेच्‍या वतीने प्रकाशित केलेल्‍या दिनदर्शिकेचे विमोजन करण्‍यात आले.
प्रास्‍ताविकात डॉ स्मिता सोळंकी यांनी विद्यापीठ विकसित विविध कृषी अवजारे व यंत्राची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ मधुकर मोरे यांनी केले तर आभार डॉ डि डि टेकाळे यांनी मानले. तांत्रिक सत्रात सुधारित कृषि अवजारांवर डॉ स्मिता सोलंकी, अपारंपारिक ऊर्जा साधनांवर डॉ आर टि रामटेके, सेंद्रीय शेतीवर डॉ आनंद गोरे, रेशीम उद्योगावर डॉ चंद्रकांत लटपटे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी नामदेव लाखाडे, तुकाराम दहे, नरेश शिंदे, पंडित थोरात, रामचंद्र शिंदे, मदन महाराज, गो‍विंद देशमुख आदीसह परभणी, जालना, वाशिम जिल्‍हयातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अजय वाघमारे, डि व्‍ही यंदे, भरत खंटिग, महादेव आव्‍हाड आदीसह कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.