Wednesday, February 12, 2020

भावी पिढी सुद्दढ करावयाची असेल तर गाव तेथे बियाणे बॅक उभारली पाहिजे ...... पद्मश्री मा श्रीमती राहीबाई पोपेरे

वनामकृविच्‍या तुळजापुर कृषि विज्ञान केद्रात आयोजित महिला मेळाव्‍यात प्रतिपादन

विविध पिकांची देशी वाण हे कमी पाण्यावर आणि कुठल्याही रोगांना कधीच बळी न पडणारे असून येणा-या पिढीला ही नैसर्गिक देणच वाचवू शकेल. बियाण्यांची साठवणूक राखेत केल्यामुळे त्यांची उगवण क्षमता वाढतेतसेच बियाण्यापासून होणा-या उत्पादनामुळे मानवांना कुठल्याच आजार उदभवत नाही. देशात आज गावोगावी पैशांच्या बॅंका झाल्‍या आहेत, परंतु भावी पिढी सुदृढ करावयाची असेल तर प्रत्येक गावात बियाणे बॅंकउभारली गेली पाहिजे, असे प्रतिपादन पद्श्री पुरस्कार प्राप्त बीजमाता मा श्रीमती राहीबाई पोपेरे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रात दिनांक १२ फेब्रुवारी रोजी आयोजित महिला मेळाव्यात्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी कुलगूरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बजरंग मंगरूळकर, प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती शैलजा नरवडे, महिला उद्योजिका श्रीमती अर्चना भोसले, श्रीमती गोदावरी क्षीरसागर, उस्मानाबाद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राकेश अहिरे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री. सचिन सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात कुलगूरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, सध्या बाजारातील भाजीपाला विविध रासायनिक खतं, बियाणे, तणनाशके, किटकनाशके यांच्या वापरापासून तयार झालेला असून तो शरिरास कीती पोषक आहे, यात शंका आहे. ग्रामीण भागात पोषणाची व्यवस्था सध्या खूप गंभीर असून कुटुंबात पोषणवरून महिला-पुरूष, कनिष्ठ-वरिष्ठ असा भेदभाव केला जातो. तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राचा महिला केंद्रीत उपक्रम राबविण्यात चांगला हातगंडा असून यावर्षी पोषणमूल्य आधारित परसबागेची निर्मिती हा नाविन्यपूर्ण उपक्रमाने वर्षाची सुरूवात केली आहे. या उपक्रमामुळे घराघरात पोषण सुरक्षा पोहचविण्‍याचा प्रयत्‍न होणार असुन यामध्ये देशी बियाण्यांचे जतन, प्रसार आणि प्रचार होणे क्रमप्राप्त ठरते. आदिवासी समाजात रानभाज्यांचे महोत्सव भरविले जातात, हा विचार येणा-या पिढीसाठी प्रेरणादायी असून याचे अनुकरण शहरी भागात देखील झाले पाहिजे. प्रत्येकाने घराभोवती परसबागेत देशी भाजीपाला वाणांची लागवड करण्याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती शैलजा नरवडे आपल्या भाषणात म्हणाल्या की, पोषणमूल्य आधारित परसबागेमुळे महिलांसोबत जमिनीचे आरोग्य सुधारते आणि हे पर्यावरण पुरक देखील असल्‍याचे सां‍गुन त्यांच्यासोबत आजमितीला गावातील ५४ महिलांनी स्वतःच्या शेतावर प्रत्येकी एक एकर क्षेत्रामध्ये परसबागेची निर्मिती केली असून त्यामध्ये विविध देशी भाजीपाल्यासोबत, गांडूळशेती, कुक्कुटपालन, अॅझोला आदि गोष्टींचा अंतर्भाव केलेला असल्‍याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख शास्त्रज्ञ श्री. सचिन सूर्यवंशी यांनी तर सुत्रसंचालन श्री.रमेश पेठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती वर्षा मरवाळीकर, डॉ भगवान अरबाड, श्रीमती अपेक्षा कसबे, श्री गणेश मंडलिक, श्री विजयकुमार जाधव,  डॉ श्रीकृष्ण झगडे, श्री. सखाराम मस्के आदीसह कार्यालयातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

मा श्रीमती राहीबाई पोपेर यांचा अल्‍प परिचय
मा श्रीमती राहीबाई पोपेर यांनी मागील 14 वर्षात एकूण 50 देशी वाणांच्या 165 जाती त्यांच्या गावात नैसर्गिक पध्दतीने वाढविल्या आहे, हे काम पैशासाठी न करता समाजाच्या उन्नतीसाठी केले असून हे काम देशभर फिरून गावोगावी करणार असल्‍याचा मानस त्‍यांनी व्‍यक्‍त केला. त्‍या शाळेची कधीच पायरी न चढता, अशिक्षित असून देखील जे काही शिक्षण मिळाले ते काळया आईच्या सानिध्यातच प्राप्त झाले असुन मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा स्वतःचा नसून काळया मातीचा पुरस्कार आहे, असे ते मानतात. त्यांनी त्यांच्या कार्याची सुरूवात अहमदनगर जिल्हयाच्या छोटयाशा गावातून बचत गटामार्फत करून जिल्हयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.