Wednesday, February 19, 2020

चारित्र्य संपन्‍न समाज निर्मितीकरिता शिवचरित्राचे वाचन आवश्‍यक..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण


वनामकृवित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍साहात साजरी
मोठया कालखंडानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आजही मोठया उत्‍साहाने आपण साजरी करून त्‍यांच्‍या प्रती असलेला आदर आपण व्‍यक्‍त करतो. छत्रपतीचे कार्य आजही प्रेरणदायी असुन त्‍यांचे विचार व गुण प्रत्‍येकांनी आत्‍मसात करण्‍याचा प्रयत्‍न करावा. चारित्र्य संपन्‍न समाज निर्मितीकरिता प्रत्‍येकांनी शिवचरित्राचे वाचन करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्‍यात आली, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उद्य खोडके, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद सावते, सामुदायीक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ जयश्री झेंडे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. तसेच ढोलताशाच्‍या गजरात शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेची मोठया उत्‍साहात मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर भोजने यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, प्राध्‍यापक व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.