वनामकृवितील तज्ञांचा सल्ला
कपाशीचे पीक सध्या पाते व फुल लागण्याच्या अवस्थेत आहे तसेच जूनमध्ये लवकर लागवड केलेल्या कपाशीमध्ये बोंड पक्व होत आहेत. सध्या वातावरणामध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. कधी उघाड होऊन तापमानात वाढ होत आहे..तर कधी सलग ५-६ दिवस पावसाचे वातावरण होत आहे. अशा हवामान बदलामुळे कपाशीत पातेगळ होण्याची शक्यता आहे. तसेच रसशोषण करणा-या किडीमध्ये फुलकीड्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येत आहे व काही ठिकाणी बोंडअळीचाही थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच येणाऱ्या काळात आकस्मिक मर, जिवाणूजन्य करपा सुध्दा येण्याची शक्यता आहे, तरी शेतकरी बांधवांनी नियमित सर्वेक्षण करुन लक्षणानुसार पुढील प्रमाणे उपाययोजना करण्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील तज्ञांनी दिला आहे.
रसशोषक किडी विशेषत: फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास
गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाकरिता
कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात. निरिक्षणासाठी एकरी गुलाबी बोंडअळीसाठीचे दोन कामगंध सापळे लावावेत. कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा १ अळी प्रति १० फुले किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास खालीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी. यात एकरी प्रोफेनोफॉस ५० टक्के ४०० मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ८८ ग्रॅम किंवा प्रोफेनोफोस ४० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ४ टक्के हे पूर्व मिश्रित कीटकनाशक ४०० मिली आलटून पालटून फवारावे.
जिवाणूजणन्य करपा व्यवस्थापन
जिवाणूजन्य करपा व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० टक्के हे बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ५०० ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी.
आकस्मिक मर
काही ठिकाणी कपाशीमध्ये मोठ्या उघाडी नंतर पाऊस झाल्यास आकस्मिक मर ही विकृती दिसून येत आहे. त्याकरिता शेतातील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया अधिक १०० ग्रॅम पालाश (पोटॅश) अधिक २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली आळवणी करावी. किंवा १ किलो १३:००:४५ अधिक २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.
नैसर्गिक पातेगळी व्यवस्थापन
कपाशीतील नैसर्गिक पातेगळीचे व्यवस्थापन करण्यासाठी नॅपथेलिन ॲसीटीक ॲसीड (एनएए) २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कापूस पिकामध्ये दोन महिन्यानंतर नत्रयुक्त खताची मात्रा देण्यासाठी बागायती साठी ५२ किलो आणि कोरडवाहू साठी ३१ किलो युरिया प्रति एकर द्यावा.
तसेच अधिक उत्पादनासाठी कापूस पिकामध्ये २ टक्के डीएपी (२०० ग्रॅम) अधिक ५० ग्रॅम सुक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२ प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.
लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कपाशीच्या शेतामध्ये २० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा (फुले लागण्याच्या आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत) फवारावे.
फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे कमी पाणी वापरल्यास कीड व रोगांचे अपेक्षित व्यवस्थापन होत नाही. किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी.मांडगे आदींनी दिला आहे. अधिक माहितीसाठी केंद्राच्या दुरध्वनी क्रमांक ०२४५२ २२९००० यावर संपर्क साधावा.
संदर्भ
संदेश क्रमांक: ०९/२०२२ (०७ सप्टेंबर २०२२)
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी