Saturday, September 24, 2022

तेलबिया पिकांखालील लागवड क्षेत्र वाढीकरिता प्रयत्‍न करण्‍याची गरज ....... राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार

वनामकृवितील आयोजित कृषि प्रदर्शनीची राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांनी केली पाहणी

ड्रोन बाबत माहिती देतांना

रेशीम पासुन तयार करण्‍यात आलेला हाराने सत्‍कार 


आज देश खाद्यतेल आयात करत आहे, राज्‍यात करडई, सुर्यफुल, भुईमुग आदी तेलबिया पिकांखालील लागवड क्षेत्र कमी झाले असुन यामागील कारणांचा शोध घेऊन तेलबिया पिक लागवडीखालील क्षेत्र वाढीकरिता कृषी विद्यापीठ आणि कृषि विभागाने प्रयत्‍न करावेत, असा सल्‍ला राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांनी दिला. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात दिनांक २४ सप्‍टेंबर रोजी आयोजित कृषि प्रदर्शनाची पाहणी राज्‍याचे माननीय कृषि मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांनी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणिमाजी खासदार मा अॅड. सुरेश जाधव, दापोली कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्‍य श्री प्रविण देशमुख, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदमविभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री विजय लोखंडे, प्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ गजानन गडदे आदीसह विविध पदाधिकारी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, शेतकरी उपस्थित होते.

कृषि प्रदर्शनीतील विद्यापीठ विकसित विविध पिकांच्‍या वाण तसेच कृषि तंत्रज्ञानाची माहिती घेतांना मा. ना. श्री. अब्‍दुल सत्‍तार म्‍हणाले की, विद्यापीठाने अनेक कमी खर्चीक तंत्रज्ञान विकसित केले आहेत, पिकांची अनेक चांगली वाण विकसित केले आहे, हे सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहचले पाहिजे. मराठवाडयातील काही जिल्‍हयात शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाला, त्‍यामुळे शेतकरी बांधवाचे मोठे नुकसान झाले. शासनाने ९८ कोटी रूपये नुकसान भरपाई दिली. या शंखी गोगलगाई चा प्रादुर्भाव वाढत गेला तर भविष्‍यात शेती करणे मुश्‍कील होईल. कृषि विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी यावर त्‍वरित उपाययोजना शोधुन काढण्‍याच्‍या सुचना केल्‍या. आज शेतकरी बांधवापुढे मजुरांचा मोठा प्रश्‍न असुन ड्रोन तंत्रज्ञानाचा फवारणी करिता वापर केल्‍यास कमी वेळात फवारणी करणे शक्‍य होणार आहे, विद्यापीठाने ड्रोन फवारणीचे प्रशिक्षण आयोजित करावेत. ड्रोन खरेदीस मोठा खर्च येतो, याकरिता शेतकरी बांधवांना गटाच्‍या माध्‍यमातुन एकत्रित येऊन ड्रोन खरेदी करावे. विद्यापीठाने इथेनॉल किंवा जैवइंधनावर जालणारे ड्रोनची निर्मिती करावी. शेतकरी आत्‍महत्‍या मुक्‍त महाराष्‍ट्र करण्‍याकरिता सर्वांनी एकत्रित करण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

यावेळी माननीय कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतकरी बांधवा पर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहचविण्‍याकरिता विद्यापीठ कटिबध्‍द असुन शेतकरी बांधवाच्‍या मागणीनुसार कृषी तंत्रज्ञान व मार्गदर्शन करण्‍यात येईल. विद्यापीठाच्‍या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराज्‍यासाठीउपक्रम मराठवाडयात मोठया प्रमाणात राबविण्‍यात येत असल्‍याचे ते म्‍हणाले. माननीय कृषिमंत्री यांच्‍या प्रदर्शनी पाहणी दरम्‍यान कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, आदीसह विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी विविध तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.