Thursday, September 15, 2022

मा श्री दादा लाड यांच्‍या तंत्रज्ञानानुसार लागवड केलेल्‍या कापुस प्रक्षेत्राची पाहणी

वनामकृविचे माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांची मौजे सायाळा खटिंग येथील श्री शिवाजी खटींग यांच्‍या कापुस प्रक्षेत्रास भेट

मा श्री दादा लाड यांनी आपले शेतीतील अनुभवाच्‍या आधारे कापुस लागवड पध्‍दतीत स्‍वत:चे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या लागवड पध्‍दतीत कपाशीच्या बुडातल्या गळफांद्या काढून टाकुन झाडावर केवळ फळफांद्या ठेवण्‍यात येतात. यामुळे फळफांद्याना भरपूर अन्नद्रव्ये मिळते आणि झाडाचे खोड शेंड्यापर्यंत जाड होते. सोबतच बोंडाचा आकारात वाढ होऊन कापुस उत्‍पादनात भरीव अशी वाढ होते. मा श्री दादा लाड यांच्‍या मार्गदर्शनानुसार या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकरी बांधवा मध्‍ये होत असुन मौजे सायाळा खटींग येथील शेतकरी श्री शिवाजी खटींग यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून कापसाची लागवड केली आहे. सद्यास्थितीत सदर कापसाची वाढ अत्‍यंत चांगली असुन कापसाचे चांगले उत्‍पादन येण्‍याची शक्यता आहे.

सदर कापसाच्‍या प्रक्षेत्रास दिनांक १५ सप्‍टेबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मा श्री दादा लाड, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, अस्थिरोग तज्ञ डॉ केदार खटींग, श्री शिवाजी खटींग आदीसह गावातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

कापुस प्रक्षेत्राची पाहणी करतांना मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतकरी स्‍वत: एक मोठा शास्‍त्रज्ञ असुन आपल्‍या अनुभवाच्‍या आधारे शेतकरी बांधवानी अनेक तंत्रज्ञान विकसित केले आहे. विद्यापीठ कृषि संशोधनात शेतकरी बांधवांचाही सहभाग घेणार आहे. मा. श्री दादा लाड यांचे कापसातील तंत्रज्ञान निश्चितच चांगले असुन या तंत्रज्ञानाचा विद्यापीठ संशोधनात समाविष्‍ठ करण्‍यात येऊन शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न राहणार आहे.

स्‍वत: विकसित केलेले कापुस लागवड तंत्रज्ञानाची माहिती देणांना मा श्री दादा लाड म्‍हणाले की,  कपासातील दोन झाडे आणि दोन ओळीतील आंतर कमी करून झाडांची संख्‍या योग्‍य राखणे आवश्‍यक आहे. झाडाच्या खालच्या गळफांद्या काढल्याने दाटी कमी होते. गळफांद्या काढल्यावर खोड शेंड्यापर्यंत जाड बनते. गळफांद्या काढल्याने बोंडाचा आकार मोठा होण्‍यास मदत होते. एकरी झाडांची संख्या वाढल्याने उत्पादनात वाढ होते.

विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर म्‍हणाले की, मा श्री दादा लाड यांचे तंत्रज्ञान पध्‍दतीत एकरी झाडांची संख्‍या योग्‍य राखल्‍यामुळे कापुस उत्‍पादनात वाढ होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री भगवानराव खटींग यांनी केले. कार्यक्रमास डॉ आनंद गोरे, डॉ प्रविण कापसे, डॉ अनंत लाड आदीसह गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.