Friday, September 2, 2022

सोयाबीन पिकात शेंगा भरतांना येणा-या किड आणि रोगाचे व्यवस्थापन

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

तंबाखू वरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा)

सध्या सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून बऱ्याच ठिकाणी पापडी अवस्थेतील शेंगा भरत आहेत, अशा अवस्थेत सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात चक्री भुंगा, खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा- लष्करी अळी) या पंतगवर्गीय किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर काही ठिकाणी केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. या किडींचे वेळीच व्यवस्थापन नाही केल्यास सोयाबीन उत्पन्नात मोठे नुकसान होऊ शकते. त्यासोबतच पावसाचा खंड पडल्याने पिकास पाण्याचा ताण बसत आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी सोयाबीन वर रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगामध्ये प्रादुर्भाव झालेली पाने सुरुवातीला पाण्यात भिजल्या प्रमाणे दिसतात त्यानंतर लवकरच हिरवट-तपकिरी ते लालसर-तपकिरी होतात. संक्रमित भाग नंतर तपकिरी किंवा काळ्या रंगाचा होतो. जास्त पाऊस किंवा जास्त दमट परिस्थितीत, बुरशीच्या मायसेलियल वाढीप्रमाणे पानांवर जाळी तयार होते. पानांवर गडद तपकिरी स्क्लेरोशिया तयार होतात. रिमझिम पावसामध्ये या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन उत्पन्नात घट येऊ शकते त्यामुळे वेळीच उपायोजना करणे आवश्यक आहे.

मागिल काही वर्षांच्या अनुभवावरून असे लक्षात येते की येणाऱ्या काळात शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगांचा ही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन पुढील प्रमाणे कीड व रोगांचे व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला वनस्‍पती रोगशास्‍त्रज्ञ डॉ के टी आपेट, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ जी डी गडदे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ डी डी पटाईत आदींनी केले आहे.

किडींचे व्‍यवस्‍थापन 

क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ६० मिली प्रती एकर किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लँम्बडा सायहँलोथ्रिन ९.५ टक्के हे पूर्वमिश्रित कीटकनाशक एकरी ५० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ टक्के अधिक लँम्बडा सायहँलोथ्रिन ४.६ टक्के हे पूर्वमिश्रित कीटकनाशक एकरी ८० मिली किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८ टक्के हे एकरी १०० ते १२० मिली किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के हे पूर्वमिश्रित कीटकनाशक एकरी १४० मिली यापैकी कुठलेही एक कीटकनाशक फवारावे. सदरिल कीटकनाशक सर्व प्रकारच्या किडी (खोडकीडी आणि पाने खाणा-या अळ्या) करीता काम करतात. म्हणून किडीनुसार वेगळे-वेगळे कीटकनाशक फवारण्याची आवश्यकता नाही.

रोगांचे व्यवस्थापन

पानावरील ठिपके, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाकरीता टेब्युकोनॅझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्के हे पूर्वमिश्रित बुरशीनाशक एकरी ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ टक्के हे २५० मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन २० टक्के हे १५० ते २०० ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन १३.३  टक्के अधिक पिक्साकोनाझोल ५ टक्के हे पूर्वमिश्रित बुरशीनाशक एकरी ३०० मिली प्रमाणे फवारावे. पिवळ्या मोझॅक रोगाकरिता प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून बांधावर न टाकता नष्ट करावीत आणि रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी किडीचे व्यवस्थापन करावे

पिकास पाण्‍याचा ताण बसत असल्‍यास

पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे तसेच कोरडवाहू सोयाबीनला अवर्षणप्रवण परिस्थितीत तग धरून ठेवण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच १३:००:४५ खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फवारणी करतांना पाण्याची मात्रा शिफारसी प्रमाणेच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. किडनाशके फवारणी करतांना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी ०२४५२ – २२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क करावा.

संदर्भ : संदेश क्रमांक: ०७/२०२२  (०१ सप्टेंबर २०२२), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

केसाळ अळी