Sunday, October 9, 2022

वनामकृवित गहू लागवड तंत्रज्ञान विषयावर निवासी विस्तार प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि औरंगाबाद येथील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर दरम्यान गहू लागवड तंत्रज्ञान विषयावर कृषि विभागातील विस्तार कार्यकर्ते यांच्याकरिता तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण विद्यापीठात संपन्‍न झाला. प्रशिक्षणात लातूर आणि औरंगाबाद कृषि विभागातील आठही जिल्ह्यातील एकूण ४० कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक पदावरील विस्तार कार्यकर्त्यानी सहभाग घेतला.

प्रशिक्षणामध्ये गहू लागवड तंत्रज्ञानाविषयी विविध विषयांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यात गहू पिकाचे विविध वाण आणि लागवड तंत्रज्ञान याविषयी गहू पैदासकार डॉ.सुनिल उमाटे, खत आणि पाणी व्यवस्थापनावर विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, तण व्यवस्थापनावर कृषि विद्यावेत्ता डॉ. सुनिता पवार, रोग व्यवस्थापनावर पीक रोग शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, कीड व्यवस्थापनावर वरीष्ठ संशोधन सहाय्यक श्री. मधूकर मांडगे, रब्बी ज्वारीचे मूल्यवर्धन यावर सहाय्यक प्राध्यापक डॉ. मधुमती कुलकर्णी, समाजमाध्यमांचा विस्तार कार्यात प्रभावी वापर यावर जनसंपर्क अधिकारी डॉ.प्रविण कापसे, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर व घोणस अळी व्यवस्थापन यावर किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत आदींनी मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकातंर्गत गहू व मका संशोधन केंद्र, सोयाबीन संशोधन केंद्र, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) याठिकाणी भेट देऊन विद्यापीठामध्ये चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

सदरील प्रशिक्षण रामेती, औरंगाबाद तर्फे प्रायोजित होते, त्याकरिता रामेती औरंगाबाद चे प्राचार्य डॉ. अभयकुमार पडिले, सहाय्यक संचालक श्री.एम.एस.गुळवे, कृषी पर्यवेक्षक श्री.एम.एन.सिसोदिया, श्री.डी.आर.करांडे, श्री.भगवान वाकडे यांनी आयोजन केले होते. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी श्री.डिगांबर रेंगे, श्री.ज्ञानेश्वर माहोरे, श्री.नितीन मोहिते, श्री. पांडुरंग डिकळे, शेख साजीद यांनी परीश्रम घेतले.