Monday, April 20, 2026

वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर येथे भेट; कडधान्य संशोधनातील सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दि. १८ एप्रिल २०२६ रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कानपूर येथील भारतीय कडधान्य संशोधन संस्थेस ( ICAR-Indian Institute of Pulses Research) भेट दिली.

यावेळी भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर येथे रब्बी कडधान्य प्रकल्प समन्वयक डॉ. शैलेश त्रिपाठी यांनी माननीय कुलगुरूंचे स्वागत करून संस्थेमध्ये कडधान्य सुधारणा (Pulses Improvement) क्षेत्रात केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.

यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कडधान्य संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञ डॉ. मनमोहन देव, डॉ. प्रसून वर्मा आणि इतर यांच्यासोबत बैठक घेऊन विविध विषयांवर सखोल चर्चा केली. तसेच त्यांनी तेथील मिनी डाळ मिल व कडधान्य प्रक्रिया युनिटमधील आधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी केली.

या भेटीदरम्यान हरभरा (Chickpea) व तूर (Pigeonpea) पिकांच्या संशोधन क्षेत्रात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कानपूर येथील भारतीय कडधान्य संशोधन संस्था व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या सहकार्यामुळे कडधान्य उत्पादनवाढ व शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे माननीय कुलगुरूंनी यावेळी नमूद केले.




Visit of Hon’ble Vice Chancellor of VNMKV to ICAR–Indian Institute of Pulses Research, Kanpur; Emphasis on Strengthening Collaboration in Pulses Research

The Hon’ble Vice Chancellor of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Prof. (Dr.) Indra Mani, visited the ICAR–Indian Institute of Pulses Research (IIPR), Kanpur, on April 18, 2026.

On this occasion, Dr. Shailesh Tripathi, Project Coordinator (Rabi Pulses), welcomed the Hon’ble Vice Chancellor and provided a detailed overview of the institute’s work in the field of Pulses Improvement.

Subsequently, Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani held a meeting with scientists including Dr. Manmohan Dev, Dr. Prasun Verma, and others, where in-depth discussions were conducted on various aspects of pulses research. He also visited the Mini Dal Mill and pulses processing unit to review the modern machinery installed there.

During the visit, constructive discussions were held regarding strengthening collaboration between ICAR–Indian Institute of Pulses Research, Kanpur and Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth in the research of chickpea and pigeonpea crops. The Hon’ble Vice Chancellor noted that this collaboration would significantly contribute to increasing pulses production and making improved technologies available to farmers.


Friday, April 17, 2026

पाण्याची बचत हिच पाण्याची निर्मिती : जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यानिमित्त वनामकृवीत उपक्रम

पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

“पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती” हा महत्त्वपूर्ण संदेश देत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२६’ अंतर्गत एकदिवसीय चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यशाळा व जलजागृती कार्यक्रम दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी  उत्साहात संपन्न झाला.

जलसंपदा विभागाच्या वतीने दिनांक १५ ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या पंधरवाड्याचा एक भाग म्हणून आयोजित कार्यक्रमास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चंद्रशेखर ताटे, श्री. सलीम शेख तसेच श्रीमती लांजेकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यापीठातील पाणी व्यवस्थापन योजनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, पिक पद्धती योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. के. टी. जाधव, सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस. बी. जाधव  व शास्त्रज्ञ डॉ. विशाल इंगळे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पाण्याचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, भविष्यातील गरजा लक्षात घेता पाण्याचे काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात होणारी अतिवृष्टीचे योग्य नियोजन केल्यास पूरस्थितीवर मात करता येऊ शकते. या अतिवृष्टीच्या पाण्याचा लाभ घेवून त्याचे कालव्यांद्वारे विविध भागात वळवून शेततळे भरून घेणे तसेच विविध जलसंधारण उपाययोजना राबविल्यास शेतकऱ्यांना व नदीकाठील गावांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जल व्यवस्थापनातील अनेक समस्या सोडविता येतात, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. हरीश आवारी यांनी लाभक्षेत्रातील पाणी वितरण व त्यासाठी आवश्यक शास्त्रीय बाबींचे सादरीकरण केले. डॉ. के. टी. जाधव यांनी पीक पद्धती संदर्भात मार्गदर्शन केले, तर डॉ. विशाल इंगळे यांनी अचूक पाणी नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) चा वापर कसा करता येईल याविषयी माहिती दिली. डॉ. एस. बी. जाधव यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. शिंदे यांनी केले. कार्यक्रमास जलसंपदा विभागातील अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Thursday, April 16, 2026

वनामकृविच्या पाणी व्यवस्थापन प्रकल्पाद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचाचे वाटप

सूक्ष्म सिंचन म्हणजे पाण्याची बचत, शेतीची समृद्धी आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल! – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेअंतर्गत भुवनेश्वर येथील भारतीय जल व्यवस्थापन संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी तुषार सिंचन संच वाटप कार्यक्रम दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, तसेच प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी आणि परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव (ठोंबरे) व करडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुसूचित जाती (SC SP) उपयोजनेअंतर्गत पिंपळगाव (ठोंबरे), ता. जि. परभणी येथील १० शेतकऱ्यांना तसेच अनुसूचित जमाती (TSP) उपयोजनेअंतर्गत करडगाव, ता. जि. परभणी येथील ०५ शेतकऱ्यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते एकूण १५ तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी शेतीमध्ये पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अपेक्षित केलेल्या सर्वसमावेशक विकासासाठी सूक्ष्म सिंचनाचा उपयोग महत्त्वाचा ठरू शकतो, असे त्यांनी प्रतिपादन केले. पाणी बिना और ज्ञानी बिना खेती नहीं” या ओळींमधून त्यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी तुषार व ठिबक सिंचन पद्धती तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या वाण व तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी केले. त्यांनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व संशोधन कार्याची माहिती दिली. तसेच डॉ. सुमंत जाधव (विभाग प्रमुख) व डॉ. विशाल इंगळे (सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग) यांनी तुषार सिंचन संचाचा योग्य वापर, निगा व देखभाल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे मराठवाड्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाणी बचत तंत्रज्ञानाचा लाभ होऊन शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ऋषिकेश औंढेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. भास्कर सुरनर, श्री. सोनू धुर्वे, श्री. देवेंद्र कुरा, श्री. युवराज भोगील, श्री. विलास जाधव, श्री. प्रकाश मोते, श्री. बाळू रनेर, श्री. महादेव भाले व श्री. संजय देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व परिसरातील अनेक शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





वनामकृविच्या अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सिताफळ संशोधन केंद्रात सिताफळ प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

 सिताफळ प्रक्रिया केंद्रामुळे मूल्यवर्धन व उद्योजकतेला चालना : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि



वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत असलेल्या अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सिताफळ संशोधन केंद्रामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उभारण्यात आलेल्या सिताफळ संशोधन व प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन  दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय बंटेवाड, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे, कृषी विद्यावेत्ता डॉ. अरुण गुट्टे तसेच प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर माननीय कुलगुरूंनी प्रक्रिया केंद्रातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी केली. यामध्ये पल्पर, आईस्क्रीम मेकिंग मशीन, फर्मेंटर, ड्रायर, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड यंत्रणा, ओव्हन, थ्री-टियर कन्वेयर तसेच वॉक-इन कूलर यांचा समावेश आहे.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, सिताफळ हे अल्प कालावधीत येणारे व लवकर खराब होणारे फळ असल्याने त्यावर प्रक्रिया करून आईस्क्रीम, रबडी, कुल्फी, कस्टर्ड पावडर यांसारखे विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यास मोठी संधी आहे. या प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून तरुण उद्योजकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे यांनी केंद्राच्या स्थापनेपासून (१९९७) आजपर्यंतचा प्रवास सविस्तर मांडला. केंद्रामार्फत विकसित करण्यात आलेली दर्जेदार रोपे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्राकडे जतन केलेल्या २६ विविध जातींची माहितीही त्यांनी दिली. पुढील काळात केवळ उत्पादन वाढीवर भर न देता सिताफळाच्या गराचे मूल्यवर्धन करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा. विजयकुमार जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बालासाहेब चिल्लरगे यांनी केले.






वनामकृविच्या लातूर येथील गळीतधान्य संशोधन केंद्रात बीज प्रक्रिया केंद्र व विशेषीकृत शीतगृह प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

शीतगृह प्रकल्पामुळे कृषि उत्पादनांचे संरक्षण व शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास चालना : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील गळीतधान्य संशोधन केंद्रातील सूर्यफूल बियाणे योजने अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ‘बीज प्रक्रिया केंद्र’ व ‘विशेषीकृत शीतगृह संरचना’ या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शीतगृह प्रकल्पामुळे कृषि उत्पादनांचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येईल. आधुनिक साठवण सुविधांमुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य भाव मिळण्यास मदत होईल. अशा प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट होऊन कृषि क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या समारंभास विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, कृषि महाविद्यालय लातूरचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शेंडे, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चाकूरचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, गळितधान्ये विशेषज्ञ डॉ. मोहन धुप्पे तसेच कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य श्री. अशोक घोटमुकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. मोहन धुप्पे यांनी सांगितले की, हा प्रकल्प गळितधान्ये संशोधन केंद्राच्या प्रगतीप्रती असलेली बांधिलकी व शेतकऱ्यांप्रती असलेली निष्ठा दर्शवितो. भविष्यातील पिढ्यांसाठी उपयुक्त पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असून, सामूहिक मेहनत व संघभावनेचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. शिवशंकर पोले, श्री. रविकिरण मोरे, श्री. महेश फड, श्री. रोहित सिंदालकर, श्री. शंभू मिरकड व कु. आरती गायकवाड तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य श्री. अशोक घोटमुकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Wednesday, April 15, 2026

वनामकृविच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माननीय आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांची भेट

 विकास कामांबाबत सकारात्मक व फलदायी चर्चा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माननीय आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांनी दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व माननीय आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांच्यामध्ये कृषि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सखोल व सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधा व शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुलींच्या वसतिगृहाचा वरचा मजला बांधकाम, सुसज्ज रनिंग ट्रॅक, अत्याधुनिक जिम, प्रशस्त सभागृह तसेच मुलींच्या वसतिगृहासाठी संरक्षण भिंत उभारणी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. या सर्व कामांसाठी आवश्यक प्रस्तावांची तातडीने पूर्तता करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिले. त्यास प्रतिसाद देत माननीय आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांनी या विकास कामांसाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, कृषि महाविद्यालय अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड, उप-अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. खंदारे, सीताफळ संशोधन केंद्राचे डॉ. गोविंद मुंडे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच कार्यक्रमात भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अनुदानातून तयार करण्यात आलेल्या प्रात्यक्षिक पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मुलींच्या वसतिगृहास भेट देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. त्यांनी विद्यार्थिनींच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या व त्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षितता, सुविधा व शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.





Tuesday, April 14, 2026

वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; विचारांचे वर्षभर आचरण करण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

 




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण, दीपप्रज्वलन व धूपार्पण करून करण्यात आली.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विद्यार्थी प्रतिनिधी वामन काळबांडे आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्त्व होते, असे नमूद केले. त्यांच्या जन्माच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांच्या कठोर राजवटीखाली भारतीय जीवन अत्यंत कठीण झाले होते. १८६० ते १९०० या चाळीस वर्षांच्या कालावधीत भारतात अनेक थोर महापुरुषांचा जन्म झाला आणि त्याच काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही जन्म झाला. यावरून असे दिसून येते की, जेव्हा समाजाला पीडा होते, तेव्हा महान विभूतींचा जन्म होतो.

पूर्वी समाजात अनेक रूढी-परंपरा होत्या, ज्या अज्ञानाचे परिणाम होत्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून हे अज्ञान दूर करून जनतेचे कल्याण साधले. त्यांनी “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” असे सांगून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्वतः अत्यंत उच्च शिक्षण घेतले आणि “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश दिला.

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून भारतीय संविधानाची अतुलनीय निर्मिती केली. याशिवाय त्यांनी कृषी, अर्थव्यवस्था, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, महिलांचे अधिकार, विषमता आणि अस्पृश्यता निर्मूलन अशा विविध क्षेत्रांत मोठे योगदान देत सामाजिक क्रांती घडवून आणली.

सध्याच्या युगात शाश्वत शेती आणि आत्मनिर्भरता यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, आणि या विचारांचे बीज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच पेरले होते, असे त्यांनी नमूद केले. आज जगात अनेक ठिकाणी अशांतता असली तरी आपण शांततेत आहोत, याचे श्रेय महामानवांच्या विचारधारेवर चालणाऱ्या आपल्या समाजाला जाते, असेही त्यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण राष्ट्राचा अभिमान आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

तथागत भगवान बुद्धांचे शिक्षण संपूर्ण जगासाठी आदर्श आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांच्या पंचशील तत्त्वांचा स्वीकार केला होता, आणि आपण सर्वांनीही त्यांचे आचरण करावे, असे आवाहन त्यांनी केले. थायलंड आणि जपान हे बौद्धधर्म स्वीकारलेले देश शांत आणि प्रगत राष्ट्रे आहेत, तसेच त्या देशांत भारतीयांना सन्मानाचे स्थान दिले जाते, असेही त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी विद्यापीठात महामानवांच्या जयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचे वर्षभर आचरण करावे, असे सांगून त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे प्रतिपादन केले. पूर्वी समाजातील अनेकांचा आवाज दाबला जात होता; मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अन्यायाविरुद्ध उभे राहत परिवर्तन घडवून आणले आणि दडपलेला आवाज बुलंद केला. त्यांनी स्वतः अनेक संघर्ष सहन करत समाजसुधारणेसाठी कार्य केले व मानवाला माणूस म्हणून जगण्याची प्रतिष्ठा मिळवून दिली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यासोबतच पंचशीलाचे अनुकरण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

प्रस्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट करून महामानवांच्या विचारांचे आणि पंचशीलाचे आचरण जीवनात करावे, असे सांगितले.

याप्रसंगी डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी याचना सादर केली, तर पूज्य भदंत मुदितनंद थेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशीलाचे अनुग्रहण करून आशीर्वाद गाथा दिली. तसेच त्यांनी देश बळकट करण्यासाठी पंचशीलाच्या आचरणाचे महत्त्व स्पष्ट केले. पंचशीलाच्या आचरणातून विद्यापीठ, देश आणि संपूर्ण समाज प्रगल्भ होईल, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

कृषी महाविद्यालयातील ऋतुजा वारे विद्यार्थिनीने परखड शब्दांत व जोशपूर्ण भावनेत आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगताने आणि लेझीम पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी महाविद्यालयाच्या आठव्या सत्रातील विद्यार्थी आशुतोष मदेवाड आणि वेदांत दापके यांनी केले, तर आभार क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे यांनी मानले.

यासोबतच विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांनी आपापल्या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली.

कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी ५ वाजता विद्यापीठातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाला. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांनी समन्वय साधून उत्कृष्ट कार्य केले, तसेच विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थीस्तरीय समितीचे अध्यक्ष वामन काळपांडे, उपाध्यक्ष गोविंद दराडे, कोषाध्यक्ष सुमेध कांबळे, सचिव चंद्रशेखर खुनेवाड व इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.












Monday, April 13, 2026

वनामकृविद्वारा सोमनाथपूर (ता. उदगीर, जिल्हा लातूर) येथे तीळ बियाणे केंद्रासाठी बीज प्रक्रिया व साठवणूक गृहाचे भूमिपूजन

तीळ बियाणे केंद्रामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व उत्पादनवाढीला चालना.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सोमनाथपूर (ता. उदगीर, जिल्हा लातूर) येथील कृषि संशोधन केंद्रात राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत (२०२५-२६ ते २०२९-३०) मंजूर तीळ बियाणे केंद्रासाठी बीज प्रक्रिया व साठवणूक गृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, खाद्यतेल पिकांच्या उत्पादनवाढीसाठी शुद्ध व दर्जेदार बियाणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या तीळ बियाणे केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विश्वासार्ह बियाणे उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांची उत्पादनक्षमता वाढून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होईल. तसेच, राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हे केंद्र एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे, शुद्ध व प्रमाणित तीळ बियाणे उपलब्ध होणार असून, त्यातून उत्पादनवाढीसोबतच त्यांच्या आर्थिक उत्पन्नातही लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच, स्थानिक स्तरावर बीज प्रक्रिया व साठवणुकीची सुविधा उपलब्ध झाल्याने बियाण्यांची गुणवत्ता टिकवून ठेवणे सुलभ होणार आहे.

यावेळी विद्यापीठ अभियंता श्री. दिपक कशाळकर, कृषि महाविद्यालय (लातूर) चे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषि व्यवस्थापन महाविद्यालय (चाकूर) चे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रभारी अधिकारी प्रा. सुधीर सूर्यवंशी यांनी तीळ बियाणे केंद्र स्थापन करण्यामागील उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगितले की, या केंद्रामुळे गुणवत्तापूर्ण बियाण्यांची निर्मिती, प्रक्रिया व साठवणूक यामध्ये मोठी सुधारणा होऊन शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अमोल सुनेवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. भगवान कांबळे, श्री. जोगदंड, श्री. प्रमोद कांबळे तसेच कंत्राटदार श्री. साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले.






Sunday, April 12, 2026

वनामकृविच्या उद्यानविद्या महाविद्यालयात पालवी ऍग्रोद्वारे परीसर मुलाखत; २७ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रभावी मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पालवी ऍग्रो, पुणे या नामांकित कृषी उद्योग संस्थेच्या वतीने दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी परीसर मुलाखत (कॅम्पस इंटरव्ह्यू) चे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा उपक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली, संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार यांच्या निर्देशानुसार तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांच्या पुढाकाराने पार पडला.

या निवड प्रक्रियेसाठी पालवी ऍग्रो कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी महाविद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांची सखोल मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण तसेच उद्यानविद्या, आधुनिक शेती तंत्रज्ञान व कृषी व्यवसाय व्यवस्थापनातील ज्ञानाची कसून पडताळणी करण्यात आली. विशेष म्हणजे, उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांनुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला.

या प्रक्रियेत एकूण २७ पदवीधर व ०५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. त्यापैकी २७ विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी निवड होणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तसेच महाविद्यालयातील उच्च दर्जाच्या शिक्षण व प्रशिक्षणाची प्रचिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी विशेष अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट जोडण्यासाठी, त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या कॅम्पस प्लेसमेंट उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक अनुभव मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते स्पर्धात्मक युगात सक्षमपणे उभे राहतात, असे नमूद केले.

प्लेसमेंट अधिकारी डॉ. बी. एम. कलालबंडी व डॉ. आनंद दौंडे यांच्यासह डॉ. वैशाली भगत, डॉ. अंशुल लोहकरे, डॉ. सचिन पव्हणे, डॉ. सुबोध खंडागळे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. आशा सातपुते, प्रा. शम्मा पठाण व इतर प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.

या यशस्वी उपक्रमामुळे उद्यानविद्या महाविद्यालयाने उद्योग-शिक्षण दुवा अधिक बळकट करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.